Chandrapur – चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटेच्या सुमारास मोठा कार अपघात झाला आहे. या अपघातात तेलंगणा राज्यातील चार महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना चालकाला लागलेल्या एका डुलकीमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समजते. सलमा बेग, उकसा सकरीन, अफजल बेग आणि सहिरा बेगम अशी मृतांची नावे आहेत. या मृतांमध्ये आईसह मुलीचा समावेश आहे. अपघातात चालक अब्दुल रहमान (वय २८), नुसरत बेगम, नजहत बेगम, साहिल निशा आणि अब्दुल अरहान हे पाच जण जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब नागपूर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यानंतर नागपूरहून तेलंगणाकडे जात असताना २५ डिसेंबरच्या पहाटे १:३० च्या सुमारास त्यांचे बोलेरो वाहन राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ आले. यावेळी चालकाला डुलकी लागली आणि एका वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाचे कठडे तोडून थेट खोल खड्ड्यात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. पहाटेची वेळ असल्याने आणि अगोदर मदतीसाठी कोणीही नव्हते. मात्र, अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सोंडो गावाजवळील अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेमुळे कागजनगर परिसरात शोककळा पसरली आहे.