नागपूर : पुणे शहरातील भैरोबा नाला ते यवत दरम्यान दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असून दुसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सांगितले. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे शहरातील वर्दळीच्या रस्ता असणाऱ्या भैरोबा नाला ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून भैरोबा नाला ते यवत दरम्यान दुमजली मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात. अशा प्रशासनाला सूचना दिल्या. राज्यात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलकडून मान्यता घ्यावी. प्रत्येक प्रकल्प गतिशक्ती पोर्टलकडून मान्यता आल्यानंतरच समितीच्या बैठकीसमोर यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीत सादरीकरण केले. बैठकीस अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.