बँकॉक : थायलंडमध्ये एक भीषण रेल्वे अपघात घडला असून, धावत्या हायस्पीड पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून 80 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये मोठ्या प्रमाणावर शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. ट्रेनवर थेट कोसळली क्रेन नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात हा अपघात घडला. राजधानी बँकॉकहून उबोन रत्चाथानीकडे जाणारी ही पॅसेंजर ट्रेन सुमारे 120 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असताना रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन अचानक कोसळली. क्रेन थेट ट्रेनच्या तीन डब्यांवर पडली, त्यापैकी दोन डब्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी होते. याच डब्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली. ड्रायव्हरला ब्रेक लावण्याची संधीच मिळाली नाही ‘नेशन थायलंड’च्या वृत्तानुसार, अपघात इतका अचानक घडला की ट्रेनच्या चालकाला ब्रेक लावण्याचीही संधी मिळाली नाही. धडकेनंतर क्रेनचा प्रचंड ढिगारा डब्यांवर कोसळला, त्यामुळे अनेक डबे रुळावरून घसरले. काही डब्यांना आगही लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बचावकार्य सुरू; मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कापणी व पसरवणी उपकरणांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रेल्वे डबे अक्षरशः तुटले घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, प्रथम मोठा आवाज झाला आणि त्यानंतर दोन स्फोट झाल्यासारखे वाटले. “मी जवळ गेलो तेव्हा एका प्रवासी ट्रेनवर क्रेन कोसळलेली दिसली. क्रेनमधील लोखंडी भाग ट्रेनच्या मध्यभागी आदळला आणि डबे दोन तुकड्यांत विभागले गेले,” असे त्याने सांगितले. तातडीने चौकशीचे आदेश या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासन आणि रेल्वे विभागाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. क्रेन कोसळण्यामागचे नेमके कारण काय, तसेच सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे स्थानिक रहिवासी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.