जळगाव : जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चाळीसगाव तालुक्यातील हे दोन्ही अपघात अत्यंत हृदयद्रावक असून, त्यात तरुणांचा बळी गेला आहे. आयशरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू पहिला अपघात चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ झाला. भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हिरापूर गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेनंतर आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी जळगाव-चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांचा भीषण अपघात दुसरा अपघात चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटाजवळ घडला. देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैनला निघालेल्या कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधून एकूण सात जण प्रवास करत होते. 3 ठार, 4 गंभीर जखमी या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तुकाराम रामभाऊ अंभोरे (27), शेखर रमेश दुर्पते (31) आणि घनशाम रामहरी पिसोटे (30) यांचा मृत्यू झाला आहे. तर योगेश तुकाराम सोनवणे (28), अक्षय शिवाजी गिरे (25), ज्ञानेश्वर कांता मोड (24) आणि तुषार रमेश घुगे (26) हे चौघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेवगाव परिसरातही शोककळा पसरली असून, देवदर्शनासाठी निघालेल्या या तरुणांचं दर्शन अधुरंच राहिलं आहे.