Hong Kong – हाँगकाँगमधील एका गृहनिर्माण संकुलातील अनेक उंच इमारतींना लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला, असे शहरातील अग्निशमन दलाने बुधवारी सांगितले. घटनास्थळी नऊ जणांना मृत घोषित करण्यात आले आणि रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या इतर चार जणांना नंतर मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. सुमारे ७०० लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. न्यू टेरिटरीजमधील ताई पो जिल्ह्यातील गृहनिर्माण संकुलाच्या बाहेरील बाजूस उभारलेल्या बांबूच्या मचाणांवर आणि बांधकाम जाळ्यांवर ही आग लागली होती. वेगाने पसरलेल्या या भीषण आगीमुळे परिसरामध्ये दाट धुराचे लोट पसरले. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये एकमेकांच्या जवळ असलेल्या किमान पाच इमारतीत आगीच्या ज्वाळा पेटताना दिसत आहेत, रात्र पडताच अनेक अपार्टमेंटच्या खिडक्यांमधून आग आणि धूर बाहेर पडत असल्याचे दिसून आले. आगीत अडकलेल्या बहुतेक रहिवाशांमध्ये वृद्ध लोक असल्याचे मानले जाते आहे, असे जिल्हा परिषदेचे सदस्य लो ह्यू-फुंग यांनी बुधवारी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. आग दुपारी लागली आणि रात्री उशिरा आग लागल्यावर अधिकाऱ्यांनी आगीचे गांभीर्य ५ च्या अलार्म श्रेणीपर्यंत वाढल्याचे जाहीर केले. श्रेणी ५ ही तीव्रतेची सर्वोच्च पातळी आहे, असे अग्निशमन सेवा विभागाने सांगितले. सुरक्षिततेच्या कारणास्तव सार्वजनिक प्रकल्पांसाठी बांबूचे मचाण वापरणे वापरणे टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात करणार असल्याचे सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. पण तरिही हाँगकाँगमध्ये इमारतींच्या बांधकाम आणि नूतनीकरणाच्या प्रकल्पांमध्ये बांबूचे मचाण वापरणे सामान्य आहे.