केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरियामधील एका बारमध्ये काही हल्लेखोरांनी केलेल्या स्वैर गोळीबारामध्ये किमान १२ जण ठार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये ३ लहान मुलांचाही समावेश असून ही मुले ३, १२ आणि १६ वर्षे वयाची होती. शिवाय अन्य १३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मात्र जखमींच्या प्रकृतीविषयी अधिक तपशील त्यांनी दिला नाही. दक्षिण आफ्रिकेची प्रशासकीय राजधानी असलेल्या प्रिटोरिया येथील साउलविले या टाऊनशीपमधील एका हॉस्टेलच्या आवारात असलेल्या बारमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा गोळीबार झाला. मृतांपैकी १० जण घटनास्थळीच मरण पावले. तर दोघे रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले. एकूण ३ संशयित हल्लेखोरांनी हा गोळीबार केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास बारमध्ये घुसून स्वैर गोळीबार करायला सुरुवात केली. मात्र पोलिसांना या गोळीबाराबद्दल ६ वाजता कळवण्यात आले होते. या गोळीबारामागील नेमका हेतू समजू शकलेला नाही. जोहान्सबर्गमध्ये २०२२ साली अशाच एका घटनेत १६ जण ठार झाले होते. त्याच दिवशी एका अन्य प्रांतात झालेल्या स्वैर गोळीरामध्ये ४ जण ठार झाले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये मनुष्यवधाचे प्रमाण सर्वाधिक असून २०२४ मध्ये २६ हजार हत्या झाल्या होत्या. सरासरी दिवसाला ७० हत्या तेथे होत असतात. या हत्यांसाठी अवैध शस्त्रांचा वापर सर्रास केला जात असतो.