आयुक्तांचे स्वतंत्र आदेश : यंदापासूनच होणार अंमलबजावणी
पुणे – गणेशोत्सव मंडळांकडून लावण्यात येणाऱ्या स्वागत कमानी आणि रनिंग मंडपाचे जाणारे शुल्क माफ करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असली, तरी या निर्णयाची अंमलबजावणी होणार, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने आदेश काढत हे शुल्क यावर्षी पासून माफ करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.
स्वागत कमानींना प्रती दिन प्रती कमान 100 रुपये, रनिंग मांडवास प्रती 100 मीटरला 50 रूपये शुल्क आकारले जात होते. मात्र, शहरात अडीच हजार मंडळे असताना केवळ 10 टक्केच मंडळे ही पालिकेची परवानगी घेत असून त्यातून पालिकेस फारसे उत्पन्नही मिळत नव्हते. गणेशोत्सव नागरिक स्वयंस्फूर्तीने आणि समर्पित भावनेने साजरा करतात. उत्सवात मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा असतो.
त्यामुळे कमानी आणि रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक हेमंत रासने यांनी केली होती. तसेच त्याचा प्रस्तावही स्थायी समितीने मंजूर केला होता. त्यामुळे मुख्यसभेची मान्यता मिळेपर्यंत त्याची अंमलबाजवणी शक्य नव्हती.
त्यामुळे ही अडचण लक्षात घेत या बाबतचे स्वतंत्र निवेदन आयुक्तांसमोर ठेवत मुख्यसभा मान्यता देईल, या भरवशावर या वर्षीपासूनच अंमलबजावणी करणे शक्य असल्याचे नमूद केले होते. त्यास आयुक्तांनी शनिवारी मान्यता दिल्याचे नगरसेवक रासने यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील सुमारे 2 हजार मंडळाना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
आयुक्तांनी तातडीने निर्णय घेत गणेश मंडळांना दिलासा दिला आहे. हा उत्सव शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. त्यामुळे महापालिकेचा हा निर्णय मंडळांसाठी महत्त्वाचा ठरणार असून यापुढे मंडळांना या दोन्ही परवान्यांसाठी कोणतेही शुल्क महापालिकेस भरावे लागणार नाही.
– हेमंत रासने, नगरसेवक