पालिका प्रशासन सज्ज : स्वच्छतेसह सर्व तयारी पूर्ण
पुणे – वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवासाठीची आवश्यक तयारी महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. यात विसर्जनघाटांची स्वच्छता, दुरुस्ती, रंगरंगोटीसह आवश्यक विद्युत व्यवस्थेसह अग्निशमनदलाचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग या दहा दिवसांमध्ये 24 तास कार्यरत असणार आहे.
या शिवाय शहर स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची स्वतंत्र पथकेही कार्यरत असणार आहेत. या दहा दिवसांमध्ये शहरात मोबाइल
टॉयलेट्सही भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कालावधीत जलवाहिनी तसेच ड्रेनेज समस्या उद्भवल्यास त्यासाठी स्वतंत्र पथकही कार्यरत असणार आहे.
स्वच्छतेसाठी स्वतंत्र पथके
संपूर्ण गणेशोत्सवात घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. ही पथके गणेश आगमन तसेच विसर्जनाच्या दिवसासह इतर सर्व दिवशीही दोन शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम करणार आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, गर्दीच्या ठिकाणी तसेच मिरवणूक व विसर्जन मार्गांवर मोबाइल टॉयलेटही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच नदीपात्रात वाहून आलेला कचरा स्वच्छ करून नदीकाठच्या प्रमुख 18 विसर्जन घाटांची स्वच्छता, रंगरंगोटी, त्या ठिकाणी विद्युत व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर विसर्जन घाटांव्यतिरिक्त शहरात इतर ठिकाणी पाण्याच्या टाक्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अग्निशमन दल 24 तास तैनात
या दहा दिवसांत विसर्जन घाट तसेच आवश्यक ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक 24 तास तैनात असेल. त्यासाठी 18 प्रमुख विसर्जन घाटांवर 18 जवान तसेच 130 खासगी जीव रक्षक तैनात आहेत. त्यांच्यांकडे लाइफ जॅकेटससह इतर आवश्यक साहित्य देण्यात आले असून काठाजवळ भाविकांनी येऊ नये, म्हणून दोरखंड बांधण्यात येणार आहेत. याशिवाय नटराज घाटावर लाइफमास्ट बसविण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून या घाटांवर अग्निशमन दलाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागही 24 तास सुरू असणार आहे.
हे आहेत प्रमुख विसर्जन घाट
संगम घाट, वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर घाट, बापू घाट, विठ्ठलल मंदिर (अलका चौक), ठोसरपागा घाट, राजारामपूल घाट, चिमा उद्यान, येरवडा, वारजे-कर्वेनगर (गल्ली क्रमांक-1 नदी किनारी), नेने घाट, ओंकारेश्वर, पुलाची वाडी, खंडोजी बाबा चौक, गरवारे महाविद्यलय घाट, दत्तवाडी घाट, औंध गाव घाट, बंडगार्डन घाट, पांचाळेश्वर घाट.