पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात मानाच्या असलेल्या पाच गणपतींची प्रतिष्ठापना सोमवारी विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी जंगी मिरवणुकीने श्रींच्या मूर्ती उत्सवमंडपात घेऊन येण्याची लगबग कार्यकर्त्यांची सुरू राहणार आहे. या कार्यक्रमांची रूपरेषा मंडळांनी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे होणार आहे.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पालखीतून सोमवारी सकाळी 8.30 वाजता उत्सवमंडपातून मिरवणूक निघणार आहे. ती लाल महाल, फरासखाना, आप्पा बळवंत चौक मार्गे मूर्तीकार पाखेकर यांच्याकडून बाप्पांची मूर्ती घेऊन उत्सव मंडपात येणार आहे. श्रीराम, संघर्ष पथक, प्रभात ब्रास बॅंड, देवळणकर बंधू यांचे सनई-चौघडा वादन या गजरात मिरवणूक निघणार आहे. 11 वाजून 40 मिनिटांनी श्री. एम यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष भूषण रूपदे यांनी दिली.
तांबडी जोगेश्वरी : वेळ- 1.00
श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता मंदार लॉज येथून चांदीच्या पालखीतून निघणार आहे. लोखंडे तालीम, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता, गणपती चौक, जोगेश्वरी मंदिर या मार्गाने ती उत्सव मंडपात येईल. यानंतर दुपारी 1 वाजता गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी सतीश आढाव यांचे नगारावादन होईल. तसेच, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा पथक, ताल वाद्य पथक, विष्णुनाद शंख ही पथके मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहेत, अशी माहिती मंडळाचे राजाभाऊ टिकार यांनी दिली.
गुरुजी तालीम : वेळ – 12.30
गुरूजी तालीम मंडळाची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. शितळादेवी मंदिर, गणपती चौक, लक्ष्मीरस्ता, नगरकर तालीम, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर, सिटी पोस्ट या मार्गाने मिरवणुकीचे मुख्य मंडपात आगमन होईल. या मिरवणुकीदरम्यान येरवडा कारागृहातील कैद्यांचे ढोल ताशा पथक वादन करणार आहे. मिरवणुकीनंतर दुपारी 12.30 वाजता बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी यांनी दिली.
तुळशीबाग : वेळ- 12.30
तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी 9.00 वाजता गणपती चौकातून सुरुवात होणार आहे. रथातून श्रींचे आगमन होईल. गणपती चौक, नगरकर तालीम, आप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा, सिटी पोस्ट या मार्गाने गणपती चौकातून बाप्पांचे मुख्य मंडपात आगमन होईल. दुपारी 12.30 वाजता श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी लोणकर यांचे नगारावादन होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी दिली.
केसरीवाडा : वेळ : 11.30
केसरीवाड्याच्या गणपती बाप्पांची मिरवणूक सकाळी 10 वाजता रमणबाग चौकातून निघणार आहे. लोकमान्य टिळकांचे वंशज दीपक टिळक,गीताली टिळक, रोहित टिळक प्रणिती टिळक यांच्या हस्ते बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. मिरवणुकीत श्रीराम पथक, शिवमुद्रा पथक, बिडवे बंधूंचे सनई चौघडा वादन अशा पारंपरिक पद्धतीने केसरीवाड्यामध्ये श्रींचे आगमन होणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव अनिल सपकाळ यांनी दिली.