Late Night Eating: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेळेवर जेवण करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. कामाचा ताण, उशिरापर्यंत जागरण आणि बदललेली दिनचर्या यामुळे अनेकजण रात्री उशिरा जेवतात. मात्र आयुर्वेदानुसार ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. योग्य वेळी अन्न न घेतल्यास पचनक्रिया बिघडते आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. आयुर्वेदात पचनशक्तीला ‘अग्नी’ असे म्हटले जाते. सूर्य उगवल्यानंतर आणि दिवसभरात ही पचनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते. त्यामुळे दिवसाच्या वेळेत घेतलेले अन्न सहज पचते. मात्र सूर्यास्तानंतर शरीराची पचनशक्ती कमी होत जाते. अशा वेळी जड किंवा उशीरा घेतलेले अन्न नीट पचत नाही आणि शरीरात टॉक्सिन तयार होऊ लागतात. उशीरा जेवण केल्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. अनेकांना रात्री नीट झोप लागत नाही किंवा झोपेची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीर थकलेले, सुस्त वाटते. दिवसभर ऊर्जा कमी जाणवते. ही समस्या दीर्घकाळ सुरू राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय, उशीरा जेवणामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. अन्न नीट पचत नसल्याने गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात. आतड्यांमध्ये टॉक्सिन साचल्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया बिघडते. परिणामी शरीराची ऊर्जा पातळी कमी होते आणि थकवा वाढतो. Late-night eating आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण शक्यतो सूर्यास्तानंतर ७ ते ८ वाजण्याच्या आत करावे. जेवण हलके, पचायला सोपे आणि कमी तेलकट असावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही. जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. त्याऐवजी थोडे चालणे किंवा काही वेळ वज्रासन मध्ये बसणे फायदेशीर ठरते. यामुळे अन्न पचायला मदत होते आणि पोटाशी संबंधित तक्रारी कमी होतात. आयुर्वेदानुसार दिवसाच्या वेळेत, सूर्यप्रकाशात अन्न घेणे अधिक योग्य मानले जाते. यामुळे शरीराला आवश्यक पोषण व्यवस्थित मिळते. संतुलित, हलके आणि योग्य वेळी घेतलेले अन्न हेच चांगल्या आरोग्याचे गमक आहे. एकंदरीत, उशीरा जेवणाची सवय केवळ पचनावरच नाही, तर झोप, ऊर्जा आणि मानसिक स्थितीवरही परिणाम करते. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर वेळेवर आणि योग्य पद्धतीने जेवणे अत्यंत गरजेचे आहे.