तंत्रज्ञानाची कमाल इथेही? स्पीड पोस्टद्वारे पाठवा विसर्जनासाठी अस्थी; वेबकास्टद्वारे पहा थेट प्रक्षेपण

वाराणसी – कोरोना संसर्गाच्या कालावधीत आपले प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटूंबासाठी टपाल विभागाने एक नवीन पुढाकार घेतला आहे. “ओम दिव्य दर्शन’ या संस्थेच्या सहकार्याने डाक विभागाने घेतलेल्या पुढाकाराने आपण आपल्या कुटूंबातील सदस्यांचे अस्थिविसर्जन अथवा रक्षाविसर्जन करण्यासाठी स्पीड पोस्टद्वारे वाराणसी, प्रयागराज, हरिद्वार आणि गया येथे पाठवू शकता.
तेथे संबंधित मृतकाचे श्राद्ध इत्यादी धार्मिक संस्कार संस्थेच्या प्रतिनिधींच्या वतीने केले जातील. शिवाय श्राद्धासह अस्थि/रक्षाविसर्जन कुटुंबियांना घरबसल्या लाईव्ह वेबकास्टद्वारे पाहता येणार आहे.
कोरोना संक्रमणादरम्यान बऱ्याच लोकांनी आपले प्रियजन गमावले आणि त्यांचे शेवटचे संस्कार योग्यप्रकारे होऊ शकले नाहीत. सनातन धर्मात पवित्र नद्यांमध्ये हाडांचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्या दृष्टीने घेतलेल्या पुढाकाराने देशाच्या कोणत्याही भागातून अस्थि अथवा रक्षा पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टद्वारे उपरोक्त नमूद ठिकाणी पाठविता येतील.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छित व्यक्तीला “ओम दिव्य दर्शन’ संस्थेच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. यानंतर, अस्थी अथवा रक्षेचे पॅकेट स्पीड पोस्टद्वारे मृत व्यक्तीच्या वतीने पोस्ट ऑफिसमार्फत पाठवले जाईल. चांगल्या पॅक असलेल्या अस्थिंच्या पॅकवर ठळक अक्षरात “ओम दिव्य दर्शन’ लिहिलेले असावे जेणेकरून ते ओळखता येईल. पाठविणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबरदेखील पॅकेटवर लिहावा लागेल. केवळ प्रेषकांकडून स्पीड पोस्ट फी आकारली जाईल.
वाराणसी विभाग, पोस्टमास्टर जनरल कृष्णा कुमार यादव यांच्या म्हणण्यानुसार, स्पीड पोस्ट बुकिंगनंतर प्रेषकाने ओम दिव्य दर्शन संस्थेच्या पोर्टलवर स्पीड पोस्ट बार कोड नंबरसह बुकिंगचे तपशील अद्ययावत करावेत.
टपाल कार्यालयात हे पाकिट मिळाल्यानंतर ते ओम दिव्य दर्शनाच्या पत्त्यावर पाठवले जाईल. यानंतर संस्था अस्थिविसर्जन आणि श्राद्ध संस्कार हे मान्यताप्राप्त पुजाऱ्यांमार्फत केले जातील. या विधीच्या थेट प्रक्षेपणाची लिंक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना पाठवली जाईल आणि त्या लिंकच्या माध्यमातून कुटुंबिय/नातेवाईकदेखील हे विधी वेबकास्टद्वारे घरबसल्या पाहू शकतील.
सर्व संस्कार पूर्ण झाल्यानंतर गंगाजलची एक बाटली पोस्ट ऑफिसमार्फत संस्थेच्या वतीने मृतांच्या वारसांना पाठविली जाईल.




