प्रभात वृत्तसेवा राजुरी – कमी पावसाचा सोयाबीन पिकाला फटका बसला असून हुमणी कीडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी,बेल्हे,उंचखडक,गुंजाळवाडी,रानमळा,साकोरी,बोरी, आणे पठार भागातील गावांच्या परिसरात कमी पावसामुळे सोयाबीन पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पेरलेल्या सोयाबीनची शेती उजाड दिसू लागली आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी पेरणीसाठी पाऊस चांगला झाला,त्यामुळे परिसरात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. सोयाबीन पिकाचा उतार चांगला झाला, खुरपणी, कोळपणी शेतकऱ्यांनी केली. सोयाबीन पिकाकडे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. मात्र, सोयाबीन पिकाला पुरेसा पाऊस न झाल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. सोयाबीन भरलेली शेती हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उजाड दिसू लागली आहे. उभे सोयाबीन जळून जात असल्यामुळे सध्या येथील सोयाबीन शेतीची ५० टक्क्यांपेक्षा जास्त रिकामी दिसू लागली. हुमणीच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम झाला असून सोयाबीन उत्पादनात मोठी घट यावर्षी सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.शासनाने सोयाबीन पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.