Pimpri : भाषा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे – इम्रान शेख

पिंपरी : भाषा ही केवळ बोलण्याचे किंवा लिहिण्याचे साधन नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा आणि आपल्या ओळखीचा आत्मा आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष व महात्मा फुले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इम्रान शेख यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. कामायनी सुर्वे यांनी केले. यावेळी डॉ. गोरख थोरात यांनी “हिंदीतील रोजगाराच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. माजी विभाग प्रमुख प्रा. अलका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष व निष्ठेचे महत्त्व पटवून दिले. या वेळी डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. वैशाली खेड़कर व डॉ. अलका घोडके संपादित ‘आधुनिक हिंदी साहित्य में पर्यावरण चेतना’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी प्रेरणा दिली.
हिंदी काव्यवाचन, वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव झाला. सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुमय्या सय्यद हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. मंगेश वाडेकर यांनी केले.





