१) हायकोर्टाकडून माणिकराव कोकाटेंना जामीन शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. आज, १९ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने कोकाटे यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आलीय. या निर्णयामुळे राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, पुढे या प्रकरणात काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. २) सातारा ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण- सातारा ड्रग्स प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वप्रथम मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो. साताऱ्यात जो काही बेकायदेशीर धंदा सुरू होता, त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही खरोखरच मोठी आणि कौतुकास्पद कारवाई आहे.” तसंच, या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक राजकीय हेतूने जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आतापर्यंत जे काही पुरावे समोर आले आहेत, त्यांचा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाशी दुरान्वयेही काहीही संबंध नाही. दिशाभूल करून अशा प्रकारे संबंध जोडणं योग्य नाही,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ३) आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार; उद्धव ठाकरेंचा दावा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होऊ शकतो, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारमधील हा दुसरा राजीनामा ठरला आहे. याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना देखील मंत्रीपद सोडावे लागले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. ठाकरे म्हणाले, “गेले काही दिवस आपण पाहतोय, भाजपमध्ये असलो तरी सत्य लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. आणखी एक मंत्री जाण्याच्या मार्गावर आहे. मात्र मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केलाय. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढे नेमका कोणता मंत्री अडचणीत येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. ४) पाण्याची टाकी कोसळून तीन जणांचा मृत्यू नागपूरच्या बाहेरील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडलीय. एका औद्योगिक युनिटमध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास सौर पॅनेल उत्पादन करणाऱ्या अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात घडलीय. जमिनीवर बांधलेली मोठी पाण्याची टाकी अचानक कोसळली आणि त्याखाली कामगार अडकले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत. ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, टाकी कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळालंय. ५) शरद मोहोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला सोडा गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठा कायदेशीर उलटफेर घडलाय. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर अटक ठरवत तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांच्या गंभीर त्रुटींमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला असून, पुणे पोलिसांच्या तपासाला आणि आरोपपत्राला मोठा धक्का बसलाय. ५ जानेवारी २०२४ रोजी पुण्याच्या कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदिवसा शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांना मुख्य सूत्रधार मानले होते. मोहोळच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पनवेल येथून शेलारला अटक केली होती. मात्र, अटकेनंतर २४ तासांच्या आत त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर न केल्याचा आणि अटकेची कारणे लेखी स्वरूपात न दिल्याचा दावा शेलारच्या वकिलांनी केला. यावरून शेलारने मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ही अटक बेकायदेशीर ठरवत शेलारची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिलेत. ६) जेफ्री एपस्टीन सेक्स रॅकेट प्रकरण; बेटावरचे फोटो आणि व्हिडीओ उघड जेफ्री एपस्टीनच्या सेक्स रॅकेट प्रकरणाने जगभरात मोठी खळबळ उडवलीय. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठी उलथापालथ होताना दिसतेय. अमेरिकेत गुरुवारी हाऊस डेमॉक्रॅट्सकडून एपस्टीनच्या इस्टेटमधील तब्बल ६८ नावे आणि फोटो समोर आणण्यात आलेत. हे सर्व फोटो आता सार्वजनिक करण्यात येत असून, त्यातून धक्कादायक माहिती उघड होतय. या फोटोंमुळे अनेक बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. इतकंच नाही तर, आता या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ देखील समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. ही संपूर्ण माहिती अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीमधील डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांनी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्ध केलीय. पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येणार, याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेय. ७) रस्ते अपघातातील जखमींना मदत करा अन् २५ हजार मिळवा रस्ते अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून अपघातात जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या ‘गुड समॅरिटन’ योजनेत ऐतिहासिक बदल करण्यात आलाय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेतील सुधारणा जाहीर केल्या आहेत. आता अपघातातील जखमींना तात्काळ मदत करणाऱ्या व्यक्तींना केवळ सन्मानच नाही, तर थेट आर्थिक लाभही मिळणार आहे. या योजनेनुसार, अपघातग्रस्त जखमी व्यक्तीला त्वरित रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला आता २५ हजार रुपये रोख बक्षीस दिलं जाणार. यापूर्वी ही रक्कम फक्त ५ हजार रुपये होती, म्हणजेच बक्षीस रकमेतील तब्बल पाचपट वाढ करण्यात आलीय. इतकंच नाही तर, मदत करणाऱ्या व्यक्तीला ‘राह-वीर’ ही विशेष पदवी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. ८) उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला जिवंत जाळले बांगलादेशमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. शेख हसीना यांच्या विरोधातील नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशभरात हिंसाचाराला तोंड फुटलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा संतप्त आंदोलकांनी बांगलादेशमधील दोन मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये जबरदस्तीने घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली. याशिवाय, बांगलादेशचे संस्थापक माजी राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांच्या निवासस्थानाचीही तोडफोड करण्यात आलीय. दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीय. बीबीसी बांगलाच्या वृत्तानुसार, धर्माचा अपमान केल्याच्या आरोपावरून एका हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या केलीय. दीपू चंद्र दास असं हत्या करण्यात आलेलायचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री भालुका परिसरात घडलीय. जमावाने दीपू चंद्र दास यांना मारहाण करून ठार मारलं, त्यानंतर त्यांचा मृतदेह नग्न करून झाडाला लटकवण्यात आला आणि जाळण्यात आला. या अमानुष घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. ९) वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल पुन्हा कामावर बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबावर मोठं दुःख कोसळलंय. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयच नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात आहे. अशा कठीण काळात धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल पुन्हा कामावर परतली असून, तिने याबाबत स्वतः सोशल मीडियावर माहिती दिलीय. ईशा देओलने इंस्टाग्रामवर तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिलेय की, हा शूट नोव्हेंबरमध्येच रिलीज होणार होता. त्या वेळी तिने एका मॅगझिनच्या कव्हरसाठी शूट केले होते, त्यामुळे आता ते फोटो शेअर करत आहे. पुढील काळात या सिझनसाठी आणखी काही अपडेट्सही ती शेअर करणार असल्याचं तिने सांगितलंय . १०) गंभीर हा मॅनेजर असू शकतो, कोच नाही-कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि १९८३ विश्वचषक विजेते संघाचे शिल्पकार कपिल देव यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आलेत. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत मोठं विधान केलंय. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सत्रात बोलताना कपिल देव यांनी ‘कोच’ या संकल्पनेवर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “खऱ्या अर्थानं कोचिंगची गरज ही शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर असते. आजकाल ‘कोच’ हा शब्द खूपच सर्रास वापरला जातो. गंभीर लेग स्पिनरचा किंवा यष्टीरक्षकाचा कोच कसा असू शकतो? कपिल देव यांच्या मते, गौतम गंभीर संघाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतो, मात्र तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण संघाला कोचिंग देणं वेगळी बाब आहे. या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात नवी चर्चा रंगली असून, गंभीर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. ====================