Pimpri : वाकड बाणेर पूल खुला करण्यासाठी भूसंपादनाला वेग

पिंपरी : वाकड विशालानगर येथून बाणेर-बालेवाडीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाच्या वाहतूक उपयोगासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचे भूसंपादन अखेर गतीमान होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गेली ७ वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे लवकरच पुलासह जोड रस्ता पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
वर्ष २०१३ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी संयुक्तरीत्या या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. पुलाचे बांधकाम २०१८-१९ दरम्यान पूर्ण झाले असून, ३१ कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात आला आहे. मात्र, अजूनही हा पूल नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात आलेला नाही. हा पूल पूर्णपणे तयार असतानाही, बालेवाडी हद्दीतील रस्त्याचे भूसंपादन न झाल्याने पुलाचा उपयोग नागरिकांना करता आलेला नाही. १५,००० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीवर रस्ता विकसित करण्याची गरज असून, या जागेचे ११ खाजगी मालक जागा देण्यास नकार देत होते.
यामुळे पिंपळे सौदागर, विशालनगर, रहाटणी, कस्पटेवस्ती परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या प्रकरणाचा आढावा घेतला.
सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे दिले आदेश….
बैठकीत मंत्र्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले की, भूसंपादनासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून लवकरात लवकर जागा ताब्यात घ्या. महापालिकेने जागेची मोजणी करून त्यासाठीचे शुल्क भरले असून, आता जागांचे “अॅवार्ड” (जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया) लवकरच केली जाणार आहे.
नागरिकांना दिलासा मिळणार
या भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळाल्यास लवकरच वाकड आणि बाणेर-बालेवाडीला थेट जोडणारा रस्ता खुला होईल. परिणामी, या मार्गावरील प्रचंड वाहतूक ताण कमी होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.





