पुणे | भूसंपादनाचा निधी पडून ; एक इंचही जागा ताब्यात नाही

पुणे. {प्रभात वृत्तसेवा} – कात्रज-कोंढवा (खडीमशिन चौक) रस्ता ५० मीटर रूंद केला जाणार आहे. याकामासाठी आवश्यक भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून १३९ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी महापालिकेच्या तिजोरीत दि. १ जुलैला जमा करण्यात आला. मात्र, या निधीतून अद्याप एक इंचही जागा महापालिकेस ताब्यात घेता आलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेने केवळ कोणाची आणि किती जागा ताब्यात घ्यायची याची यादी केलेली असून प्रत्यक्षात त्यासाठीचा कोणताही प्रस्तावच तयार केलेला नाही. परिणामी, ही प्रक्रीया पूर्ण करून प्रत्यक्षात जागा ताब्यात मिळण्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कात्रज चौक ते खडी मशिन चौक असा सुमारे साडेतीन कि.मी.चा रस्ता ८४ मीटर रूंक करण्यासाठी भूसंपादनावर ७१५ कोटींचा खर्च येत असल्याने हा रस्ता ५० मीटर करण्याचा निर्णय झाला. परिणामी, भूसंपादनाचा खर्च २८० कोटींंवर आला, मे २०२३ पासून पालिकेकडून या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.
कात्रज-कोंढवा रस्ता रूंदीकरण भूसंपदानासाठी महापालिकेने शासनाने २०० कोटींची मागणी केली, त्यावर शासन आणि महापालिकेने प्रत्येकी ५० टक्के खर्च करण्याचा निर्णय झाल्याने १३९ कोटी ८३ लाखांच्या निधीस राज्य शासनाने मंजूरी दिली. हा निर्णय लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी एक दिवस आधी (१५ मार्च) घेण्यात आला. प्रत्यक्षात पालिकेस निधी मिळण्यास दि. १ जुलै उजाडला त्यानंतर हा निधी पालिकेच्या तिजोरीतच पडून आहे.
पथ विभागाचा ढीसाळ कारभार…
रस्त्याच्या रूंदीकरणासाठी निधी नसल्याचे कारण महापालिका दिड वर्षांपासून देत होती. शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा हा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे निधी मिळणार हे निश्चित होते.
त्यानुसार, प्रशासनाने तातडीच्या जागांचे प्रस्ताव तयार करणे आवश्यक होते. या निधीतून महापालिका सुमारे ४ लाख चौरसफूट जागा ताब्यात घेणार आहे. त्यात, ६० जागा मालक आहे. मात्र, पालिकेने निधी येण्याची वाट पाहत प्रस्तावच केले नसल्याने पैसे असूनही भूसंपादनास उशीर होत आहे.
तडजोडीने जागा ताब्यात घेण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यानुसार, काही जागा मालकांशी चर्चा सुरू असून पुढील आठवडयात हे प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी ठेवले जातील. – अनिरूध्द पावसकर, पथ विभाग प्रमुख





