इटलीची नामांकित कंपनी टोनिनो लॅंबोर्गिनी येत्या सहा महिन्यात भारतातील रिअल इस्टेट बाजारात येण्याची शक्यता आहे. या कंपनीचा भर भारतातील निवासी प्रकल्पावर राहणार आहे. गृहउद्योगातून येत्या पाच वर्षात एकूण उत्पन्नापैकी 15 टक्के उत्पन्न भारतातून मिळेल, अशी आशा कंपनी बाळगून आहे. यासाठी टोनिनो भारतात भागीदाराच्या शोधात आहे. विश्वासू भागीदार मिळाल्यास गृहप्रकल्प योजना लवकर कार्यान्वित करता येईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. टोनिनो लॅंम्बोर्गिनीचे धोरण हे ब्रॅंडिंग आणि आलिशान अपार्टमेंटची रचना करण्याचे असणार आहे. टोनिनो लॅम्बोर्गिनीची स्थापना लॅम्बोर्गिनी मोटारीची निर्मिती करणाऱ्या फेरुत्सो लॅम्बॉर्गिंनीच्या वारसदारांनी केली. तत्पूर्वी या कंपनीने चीन आणि संयुक्त अरब अमिरातीतील रिअल इस्टेटमध्ये काम सुरू केले आहे.
टोनिनो लॅम्बोर्गिनी कंपनीचे उपाध्यक्ष फेरुत्सो लॅम्बोर्गिनीचे नाव आपल्या आजोबांप्रमाणेच ठेवले आहे. ते म्हणतात की, भारतीय बाजारपेठेत उतरण्यासाठी आम्ही स्थानिक रिअल इस्टेट कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भात आणखी काही सांगू शकत नाही. मात्र येत्या सहा महिन्यात किमान एक करार होईल याची हमी मी देतो. कंपनीचे लक्ष्य हे प्रारंभीच्या काळात मुंबई, पुणे, बंगळूर, नवी दिल्ली, कोलकता आणि हैदराबादवर राहणार आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार असल्याने ते भागीदार निवडण्यावरून सजग आहेत. ते म्हणतात, आम्ही योजनांना आमचे नाव आणि ब्रॅंड देतो. या आधारावर ग्राहकांना आलिशान आणि गुणवत्तेची हमी मिळते. एखादेवेळी किरकोळ चूक झाल्यास कोणीही स्थानिक भागीदारावर खापर फोडणार नाही. तो टोनिनो लॅम्बोर्गिनीच्या नावानेच ओरड करणार. त्यामुळे आम्हाला नाव खराब करायचे नाही. म्हणून भागिदार निवडण्यावरून आम्ही अधिक काळजी घेत आहोत.
टोनिनो लॅम्बोर्गिनी ब्रॅंडचे लक्ष्य हे श्रीमंतासाठी घर बांधणे होय. हे आलिशान, आरामदायी आणि उच्च गुणवत्तेचे असणार आहे. या घराच्या माध्यमातून ग्राहकांना इटली संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. लॅम्बोर्गिनी म्हणतात, आजकालचे ग्राहक केवळ बाह्य नाही तर अंतर्गत सजावटीवरही अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे आम्ही रचना आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करत नाही. आम्ही इमारतीला केवळ नाव आणि ब्रॅंड देणार नाही तर आमच्याकडे टाइल, फरशी, लाइट आणि अन्य गोष्टींची देखील संपूर्ण रेंज आहे. भारतात उभारण्यात येणाऱ्या गृहकप्रकल्पातही टोनिनो लॅम्बोर्गिनी निर्मिती वस्तूंचा वापर केला जाणार आहे. सध्या फ्लॅटच्या किंमती निश्चित केलेल्या नाहीत, मात्र दुबईत टोनिनो लॅम्बोर्गिनी रेसिडेन्सी फ्लॅटची किंमत ही सुमारे 35 हजार 307 चौरस फुट दराने सुरू होते. यात फ्लॅटची किंमत किमान 2.90 कोटी रुपये असेल. दुबईत ही योजना चीनची कंपनी साकारत आहे.
ही लॅम्बॉर्गिनीची पहिली आलिशान निवासी प्रकल्प योजना आहे. हा गृहप्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. टोनिनो लॅम्बोर्गिनी रेसिडेन्स दुबई ही चीन सरकारच्या वन बेल्ट वन रोड या धोरणाचा भाग आहे. या आधारावर आशिया खंडात आर्थिक विकासाला चालना देणे हा हेतू आहे. सध्या रिअल इस्टेटमध्ये सुस्ती आ्रहे. त्यामुळे लॅम्बोर्गिनीची गुंतवणूक कितपत फायदेशीर ठरेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत ते म्हणतात, की या सुस्तीकडे आम्ही संधी म्हणून पाहत आहोत. मला बाजाराच्या स्थितीचा कोणताही फरक पडत नाही. कारण ज्या ठिकाणी मंदी येते तेथे पुन्हा तेजी येण्याची शक्यता राहते. ही कंपनी कुवेत, सौदी अरेबिया आणि अन्य देशाच्या आधारावर भारतातही कॅफे सुरू करण्यास उत्सुक आहे. लॅम्बोर्गिनी कुटुंबाने वाहन निर्मिती कंपनी ऑटोमोबिली लॅम्बोर्गिनीचा त्याग केला असून ती आता फोक्सवॅगन समूहाचा भाग बनली आहे.