Opposition Unity : लालू प्रसाद यादव – सोनिया गांधींची भेट; म्हणाले, ‘विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज’
Opposition Unity : लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट झाली. यानंतर तेजस्वी यादव यांनी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

Opposition Unity : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. लालू यादव नियमित आरोग्य तपासणीसाठी दिल्लीत आले आहेत. या भेटीत सोनिया गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लालू यादव यांच्या कन्या आणि खासदार मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी तेजस्वी यादवही उपस्थित होते.
या भेटीनंतर तेजस्वी यादव यांनी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आव्हानांचा सामना करण्याची गरज व्यक्त केली. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही, असे ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांनी सांगितले की, लालू यादव आणि सोनिया गांधी यांचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. दोन्ही नेत्यांनी कठीण काळात एकमेकांना साथ दिली आहे. त्यांच्या कुटुंबांचेही जुने संबंध आहेत. त्यामुळे बर्याच काळानंतर झालेली ही भेट महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होईपर्यंत विरोधकांचा संघर्ष सुरूच राहील, असा दावा तेजस्वी यांनी केला. दिल्लीतील रामलीला मैदानावरील विरोधकांच्या कार्यक्रमावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. रॅली अपयशी ठरल्याच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना विरोधकांची चोरी उघड झाल्यामुळे ते अस्वस्थ असल्याचे तेजस्वी म्हणाले.
दरम्यान, बिहार विधान परिषदेतील काही अपक्ष सदस्य भाजपमध्ये सहभागी झाल्याच्या मुद्द्यावरही तेजस्वी यांनी भूमिका मांडली. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केल्यास त्यांची सदस्यता रद्द व्हायला हवी, असा दावा त्यांनी केला. याबाबत लेखी तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.





