मुंबई – प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. आज घरगुती गणपती पाठोपाठ मंडळाच्या गणपतीचे सुद्धा विसर्जन होणार आहे.
लालबागच्या राजाचं आज विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी उत्तर आरती होणार आहे. त्यानंतर साडेदहा वाजताच्या सुमारास लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीकडे निघणार आहे.
दरवर्षी ज्या मार्गावरुन लालबागचा राजा विसर्जना करता निघतो तोच मार्ग यावर्षी सुद्धा असणार आहे. पण, फक्त मंडळाच्या दहा कार्यकर्त्यांसोबत लालबागचा राजा विसर्जनासाठी निघणार असून, हा विसर्जन सोहळा सोशल मीडियावर लाईव्ह दाखवला जाणार आहे.
त्यामुळे गणेश भक्तांना आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचे अखेरचे दर्शन घेता येणार आहे. गणेश भक्तांनी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांकडून आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.