बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी लालबागचा राजा धावला; मंडळाकडून किती जाहीर केली मदत पहा…

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र सध्या अतिवृष्टीच्या तडाख्याने हादरून गेला आहे. या महापुराने शेतकऱ्यांची पिकं, घरं आणि स्वप्नं उद्ध्वस्त केली आहेत. बळीराजा संकटात सापडला असताना, मुंबईतील लालबागचा राजा गणपती मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाने पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे.
राज्यात नवरात्र उत्सव साजरा होत असताना, अतिवृष्टीमुळे अनेक भागांत हाहाकार उडाला आहे. नद्यांचं तांडव, वाहून गेलेली शेतजमीन आणि पाण्याखाली गेलेली गावं यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटकाळात प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी जीव वाचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. तरीही, शेतकऱ्यांचं नुकसान इतकं प्रचंड आहे की, त्याला मर्यादा घालणं अशक्य आहे.
या पार्श्वभूमीवर, लालबागचा राजा मंडळाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले, “आमचा बळीराजा संकटात असताना आम्ही गप्प बसू शकत नाही. ही 50 लाखांची मदत म्हणजे आमच्या भावनांचा एक छोटासा अंश आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे.”
मुख्यमंत्री सहायता निधीत अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि व्यक्तींकडून मदत जमा होत आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपलं एक महिन्याचं मानधन या निधीत जमा केलं आहे. तसेच, प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेही सोशल मीडियावरून दुष्काळ आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रत्येकाने शक्य ती मदत करावी, असं आवाहन केलं आहे. “फूल नाही तर फुलाची पाकळी तरी द्या,” असं सांगत त्यांनी माणुसकीचं नातं जपण्याची हाक दिली आहे. लालबागच्या राजाच्या या पुढाकाराने बळीराजाला आधार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





