– हेमंत देसाई केंद्रीय स्तरावर कर्नाटकातील पराभवाचा सांगोपांग विचार केला जात असताना, कर्नाटक प्रदेश भाजपमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षात विजय आणि पराभवानंतर त्याची कारणे काय याचे बारकाईने विश्लेषण केले जाते. भाजपमध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि केंद्र पातळीवर सातत्याने बैठका होऊन भविष्यकाळासाठी व्यूहरचना निश्चित केली जात असते. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने 2022 पासूनच खऱ्या अर्थाने सुरू केली असून, पक्षाचे कार्यक्रम त्यानुसार होत असतात. 2014 पासून भाजपला केंद्रात आणि विविध राज्यांत सातत्याने यश मिळत गेले आहे. परंतु कधी कधी पराभवालाही सामोरे जावे लागले आहे. उदाहरणार्थ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबमध्ये भाजपला सत्ता मिळवता आली नाही आणि नुकतीच कर्नाटकमध्येही भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. कर्नाटकमधील पराभवानंतर दक्षिण भारतातील प्रमुख राज्यांमध्ये आता भाजप सत्तेत नाही. दक्षिण भारतात राजकीय प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने भाजपसाठी कर्नाटक हे अत्यंत महत्त्वाचे राज्य होते. आता तेथेच पराभव झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या “मिशन 400′ समोर चांगले आव्हान निर्माण झाले आहे. उत्तर भारतात मजबूत असणारा भाजप दक्षिण भारतात आपला प्रभाव वाढवण्याच्या धडपडीत आहे. कर्नाटक हे भाजपसाठी दक्षिणेतील प्रवेशद्वार होते. 2019 मध्ये कर्नाटकमधील 28 पैकी 25 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. कर्नाटकमधील पराभवाची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली असून, पक्षांतर्गत कोणत्या सुधारणा राबवण्याची गरज आहे, याचा त्यांनी विचार सुरू केला आहे. भाजपला कर्नाटकने लोकसभा निवडणुकीत गेली जवळपास 20 वर्षे यशच दाखविले आहे. 2004, 2009 2014 आणि 2019 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकांत उत्तम कामगिरी करून दाखवली. परंतु आगामी निवडणुकीस जेमतेम एक वर्ष शिल्लक असताना, विधानसभा निवडणुकीत बसलेला झटका पक्षश्रेष्ठींनी गंभीरपणे घेतला आहे. याबाबत श्रेष्ठींनी कर्नाटक प्रदेश भाजपकडून अहवाल मागवला होता. त्यात बंडखोरी, कॉंग्रेसची उत्तम संघटना बांधणी, कॉंग्रेसने वाटलेल्या रेवड्या आदी मुद्द्यांचा उल्लेख होता. उमेदवार ठरवण्याबाबत बसवराज बोम्मई आणि बी. एस. येडियुरप्पा यांच्या गटांतील भांडणे कायम होती. याचीही दखल घेण्यात आली. भाजपाला सदैव साथ देणाऱ्या लिंगायत मतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी कसे झाले आणि किनारपट्टी भागांत भाजपला मागील कामगिरीची पुनरावृत्ती का करता आली नाही, याबाबत राज्यातील नेत्यांकडून केंद्राला समाधानकारक खुलासा मिळालेला नाही, या गोष्टीचीही दखल घेण्यात आली आहे. कर्नाटकच्या तिकीट वाटपात संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी नको तितका हस्तक्षेप केला आणि याबाबत रा. स्व. संघाकडे तक्रार करण्यात आली आहे. केवळ मोदींच्या बळावर पुन्हा सत्तेवर येऊ, असे गृहीत धरण्यातही चूक झाल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. मात्र केंद्रीय स्तरावर पराभवाचा सांगोपांग विचार केला जात असताना, प्रदेश भाजपमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावावरून मतभेद निर्माण झाले असून, त्याचे जाहीर प्रदर्शन होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना तिकिटे द्यायची नाहीत, असा कट पक्षातील काही जणांनी रचला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी केला आहे. ते उत्तर बंगळुरूमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यातच गेल्या सोमवारी हावेरी गदग येथून तीन वेळा पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार शिवकुमार उदासी यांनी निवडणुकीच्या राजकारणातून व्यक्तिगत कारणांकरिता निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. एक वर्षापूर्वीच यापुढे निवडणुका लढवायच्या नाहीत, असे मी ठरवले होते आणि त्याप्रमाणे प्रदेश नेत्यांना कळवले होते, अशी माहिती उदासी यांनी दिली आहे. परंतु तिकीट मिळणारच नाही, या शक्यतेमुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असेल का? असा प्रश्न विचारला जात आहे. दक्षिण कन्नडमधून तीनदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रदेशाध्यक्ष नवीन कुमार कतील तसेच उत्तर कन्नडमधून सहा वेळा खासदारपदी निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांना यावेळी तिकीट नाकारले जाईल, अशी चर्चा आहे. आपल्या जहाल वक्तव्यांबद्दल हेगडे हे कुप्रसिद्ध आहेत. तुमकुरचे खासदार जीएस बसवराज यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात ते म्हणत आहेत की, आता ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, कारण त्यांचे वय झाले आहे. त्यांच्या जागी म्हणे एका माजी मंत्र्याला तिकीट मिळणार आहे. विद्यमान 25 पैकी 13 खासदारांचे तिकीट कापले जाईल, अशा बातम्या वर्तमानपत्रांनी छापल्या आहेत. त्याबद्दल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद गौडा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातीलच काही जण विद्यमान खासदारांची बदनामी करत सुटले आहेत. प्रसारमाध्यमे याबद्दलचे वार्तांकन कशासाठी करत आहेत? माध्यमे म्हणजे पक्षाची प्रवक्ते आहेत का? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत! “यापुढील लोकसभा निवडणूक सदानंद गौडा हे देखील लढवणार नाहीत’, अशी वृत्ते प्रसिद्ध झाल्यामुळे ते संतप्त झाले होते. आपला अवमान होऊ शकतो, त्यापेक्षा निवृत्ती घेतलेली बरी, असा विचार करून उदासींनी निवृत्तीचा निर्णय घेतला असेल. परंतु माझ्यासारखे अन्य नेते हे भ्याड नाहीत. आम्ही अजिबात माघार घेणार नाही. आमच्याविरुद्ध मोहीम चालवून काहीही उपयोग होणार नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे, असे गौडा यांनी ठणकावून सांगितले आहे. पक्षाच्याच खासदारांविरुद्ध अपप्रचार करायचा, अफवा पसरवायच्या, त्यांचे चारित्र्यहनन करायचे, हे फार वाईट आहे. ज्या नेत्यांनी पक्षासाठी कष्ट उपसले, त्यांच्या भावनांचाही विचार करायला कोणी तयार नाही, असा विषाद गौडा यांनी व्यक्त केला आहे. तिकडे खासदार कतील यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी मागणी पक्षातील काही कार्यकर्त्यांनी केली आहे. खरे तर कतील ज्या किनारपट्टीतील जिल्ह्यातून निवडून आले आहेत, तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी बरी झाली आहे. परंतु पुत्तूर मतदारसंघातून एका लोकप्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट नाकारले, म्हणून काहीजण संतापले आहेत. अनंत कुमार हेगडे हे आजारीच होते. आता ते बरे होत आले असले, तरी अलीकडील काळात ते सार्वजनिक समारंभांत दिसलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या तिकिटांच्या स्पर्धेत मी नाही, असे सोमन्ना यांनी सांगून टाकले आहे. यावेळी वरूण आणि चामराजनगर या दोन मतदारसंघांतून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली आणि दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यताच नाही. यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा 135 वरून 66 वर आल्या आहेत. पराभवानंतर चुका दुरुस्त करण्याऐवजी, भाजपमधील अंतर्गत मतभेद अधिकच प्रमाणात चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजप याबाबतीत कॉंग्रेसचे अनुकरण का करत आहे, असा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो!