– नित्तेंन गोखले नुकताच बोलिव्हियात एल अल्टो शहराच्या हद्दीतील महामार्गावर विमान अपघात झाला. या अपघातानंतर अवघ्या काही मिनिटांतच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चलनी नोटा विखुरल्या गेल्या. अनेकांसाठी हे स्वप्नासारखे होते. या घटनेबाबतच्या महत्त्वाच्या पैलूंवर नजर टाकूया. बोलिव्हिया हा देश दक्षिण अमेरिकेच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे. त्याची सीमा चिली, अर्जेंटिना, ब्राझील आणि पेरू या देशांना लागून आहे. बोलिव्हिया अनेकदा चुकीच्या कारणांमुळे बातम्यांमध्ये झळकतो. हा एक विकसनशील देश असून 36 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. त्यामुळे विमान अपघातानंतर लोक विखुरलेले पैसे उचलायला धावत सुटले यात काही नवल नाही. अपघातग्रस्त विमानाचे लँडिंग विमान कोणाचे होते, ते कुठून आले आणि त्याचे नेमके काय झाले? अपघातग्रस्त हवाई जहाज हे बोलिव्हियन वायुसेनेचे सी-130 हरक्यूलिस विमान होते. त्याचा नोंदणी क्रमांक एफ.ए.बी.-81 होता. हे विमान 1977 मध्ये बनवले गेले होते. त्याच वर्षी ते बोलिव्हिया लष्कराकडे हस्तांतरित झाले. या विमानाने सेवेत 49 वर्षे पूर्ण केली होती. विमान नुकत्याच छापलेल्या नोटा घेऊन सांताक्रूझ शहरातून एल अल्टो विमानतळाकडे निघाले होते. देशाची मध्यवर्ती बँक नियमितपणे प्रत्यक्ष चलन ने-आण करण्यासाठी बोलिव्हियन लष्करी विमानाचा वापर करते. पण यावेळेस ते एल अल्टो विमानतळाजवळ असलेल्या महामार्गावर कोसळले. यात रस्त्यावरील अनेक गाड्यांचे देखील नुकसान झाले. या अपघातात जवळपास 30 लोक जखमी झाले, तर 24 लोकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानातील 18 टन नोटा अपघातस्थळी विखुरल्या. जवळपासचे लोक पैसे दिसताच गोळा करण्यासाठी ढिगार्याकडे धावत सुटले. अशा बातम्या नेहमीच वार्यासारख्या पसरतात. लवकरच, घटनास्थळी शंभरहून अधिक लोक नोटा उचलण्यासाठी जमले. अपघातस्थळाचे चित्रीकरण करणार्या पत्रकारांच्या कॅमेर्यात आपला चेहरा येईल, हे लक्षात येताच नोटा चोरणार्यांनी चिडून पत्रकारांना मारहाण केली. वार्ताहरांची ब्रॉडकास्टिंग व्हॅन फोडण्यात आली. जमावामुळे आपत्कालीन सेवा कर्मचार्यांना जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यास अडथळा येत होता. नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा तसेच अश्रुधुराचा वापर केला. चोरी रोखण्यासाठी पोलिसांना अपघातस्थळी नोटा जाळाव्या लागल्या. हे पाहताच काही लोक पोलिसांवर दगडफेक करू लागले. घटनास्थळी 12 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली.पण या विमानाला अपघात कशामुळे झाला? प्रत्यक्षदर्शींनी पत्रकारांना अशी माहिती दिली की विमान कोसळले तेव्हा जोरदार गारपीट सुरू होती. त्यावेळी वीज देखील कोसळली. वाचलेल्या वैमानिकांपैकी एकाने तपासकर्त्यांना सांगितले की धावपट्टीवर भरपूर बर्फ पडला होता आणि विमानाचे ब्रेक्स काम करत नव्हते. परंतु सरकारकडून याबाबत अधिकृत अहवाल आलेला नाही. बोलिव्हियन हवाई दलप्रमुख सर्जियो लोरा यांनी पत्रकार परिषद घेतली. विमानात मालवाहतूक कर्मचारी आणि विमान कर्मचारी दलासह (फ्लाइट क्रू) 8 सदस्य होते. सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी व तपास करण्यासाठी अपघात निर्धारण मंडळ स्थापन केले आहे, असे ते म्हणाले. नोटांबाबत संदेशाचे परिणाम विमानात एकूण नोटांची संख्या 1.71 कोटी असल्याचे सांगितले जाते. या नोटा 10, 20 आणि 50 बोलिव्हियानोच्या स्वरूपात असून, त्यांची एकूण किंमत 42.3 कोटी बोलिव्हियानो इतकी होते. सरकारी सूत्रांनुसार, यातील 30 टक्के रक्कम लुटली गेली. सुरुवातीला, देशाचे संरक्षण मंत्री मार्सेलो सॅलिनास यांनी त्या चलनी नोटांना अनुक्रमांक नसल्याचे सांगून ते पैसे बेकायदेशीर घोषित केले होते. तथापि, नंतर बोलिव्हियाच्या मध्यवर्ती बँकेने (बीसीबी) स्पष्ट केले की, वाहतूक केल्या जाणार्या नोटा ‘बी’ अक्षर असलेल्या मालिकेतील होत्या. नोटांच्या अनुक्रमांकांच्या तपशिलाची सखोल माहिती देण्यात आली. या दोन विरोधाभासी वक्तव्यांमुळे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. नागरिकांना त्यांच्या नोटांची वैधता तपासण्यास मदत करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने आपल्या संकेतस्थळावर एक ऑनलाइन सुविधा (टूल) उपलब्ध करून दिली आहे. परंतु, व्यापारी आणि दुकानदारांनी अनुक्रमांकात ‘बी’ अक्षर असलेल्या सर्व नोटा स्वीकारणे बंद केले आहे. सध्या दररोज हजारो लोक त्यांच्याकडील नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर रांगेत उभे राहात आहेत. बीसीबीचे अध्यक्ष डेव्हिड एस्पिनोझा यांनी जनतेला आणि व्यावसायिकांना ‘बी’ अक्षर असलेल्या सर्व नोटा अवैध नाहीत. नोटा स्वीकारताना घाबरू नका, असे आवाहन केले आहे. पण सरकारने आणि बोलिव्हियाच्या मध्यवर्ती बँकेने नोटांबद्दल परस्परविरोधी स्पष्टीकरणे का दिली? सोप्या भाषेत सांगायचे तर, सुरुवातीला सरकारने असे जाहीर केले की, लुटलेल्या नोटांना अनुक्रमांक आणि मध्यवर्ती बँकेचे विशिष्ट क्रमांक नसल्याने त्यांना कोणतेही कायदेशीर मूल्य नाही. नंतर, मध्यवर्ती बँकेने अनुक्रमांक आणि बॅचेसची माहिती असलेले एक निवेदन प्रसिद्ध केले. थोडक्यात त्यांनी असे स्पष्ट केले की, चोरी झालेल्या सर्व नोटांना अनुक्रमांक आहेत, परंतु त्या अवैध मानल्या जातील. कदाचित सरकारकडून आलेले सुरुवातीचे विधान हे लोकांना अधिक पैसे लुटण्यापासून रोखण्यासाठी किंवा ते पैसे वापरण्यापासून परावृत्त करण्यासाठी दिलेला एक प्रतिबंधात्मक इशारा होता. दुर्दैवाने, चोरी झालेल्या नोटा आणि त्यांच्या अनुक्रमांकांच्या वैधतेबाबत दिलेल्या विरोधाभासी संदेशांमुळे लोकांमध्ये मोठा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.