– प्रा. विजया पंडित Health : भारताची आरोग्यविषयक (Health) चिंताजनक स्थिती जगासमोर आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेच्या (एसएसओ) ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतात आजारपणांच्या रूपात वेगाने होणारे बदल चिंताजनक आहेत. भारतात आजारपणाची स्थिती गंभीर रूप धारण करीत आहे. एसएसओ सर्वेक्षणानुसार, भारतात संसर्गजन्य आजाराऐवजी जीवनशैलीशी संबंधित आजारपणाने (Health) गंभीर रूप धारण केले आहे. प्रामुख्याने हृदयाशी संबंधित आजारपण, मेटाबॉलिक समस्या म्हणजेच मधुमेह, हार्मोनल असंतुलन यासारखे आजार एकूण आजारांच्या तुलनेत निम्मा सहभाग नोंदवत आहेत. अर्थात हा बदल दहा वर्षांतील आहे म्हणून आरोग्य तज्ज्ञ याकडे नवीन आरोग्य संकट म्हणून पाहत आहेत. सर्वेक्षणाचे आकलन केल्यास देशातील आता प्रत्येक आठवी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने (Health) पीडित असल्याचे लक्षात येते. 2025 मध्ये 13.1 टक्के नागरिकांनी सर्वेक्षणाच्या काळात मागील पंधरा दिवसांत कोणता ना कोणता त्रास झाल्याची माहिती दिली. हे प्रमाण 2017-18च्या तुलनेत दुप्पट आहे. हा आकडा केवळ गंभीर आजारांपुरताच मर्यादित नाही तर तो ढासळत्या आरोग्याचे चित्र मांडत आहे. तसेच नागरिकांना एकाचवेळी अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. हा अहवाल देशभरातील 1.4 लाख कुटुंबांवर आधारित आहे. यात ग्रामीण आणि शहरी या दोन्ही घटकांना सामील केले आहे. व्यापक प्रमाणात केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेले चित्र आरोग्य व्यवस्था, जीवनशैली यातील होणारा बदल सांगत आहे. अहवालानुसार, आजारपणाचा पॅटर्न वयोमानानुसार बदलत आहे. मुलांमध्ये अजूनही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्याचवेळी तरुणांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारपण वाढत आहे. ज्येष्ठांत ही स्थिती आणखीच गंभीर होताना दिसून येते. यास बर्याच काळापासून असणारे आजार कारणीभूत असतात. परिणामी आरोग्य विम्यात वाढ झाली आहे. Health ग्रामीण भागात सुमारे 47 टक्के आणि शहरी भागात सुमारे 44 टक्के लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या विमा योजनेशी जोडलेली आहे. तरीही उपचारापोटी बराच पैसा नागरिकांना स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणारा खर्च अजूनही अनेकांसाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे. प्रामुख्याने हृदयविकार, मूत्रपिंड विकार यासारख्या गंभीर आजारपणात तर कुटुंबांची आर्थिक स्थिती काहीवेळा बिकट झाल्याचे दिसून येते. अहवालात म्हटल्यानुसार, काही प्रकरणात गंभीर आजारापोटी जादा खर्च होत असल्याने सरासरी खर्चात वाढ होते. परिणामी हृदयविकाराच्या आजारपणामुळे संबंधित कुटुंबावर पडणारा आर्थिक भार हा अडचणीत आणणारा ठरतो. आजारपणाच्या बदलत्या स्वरूपामुळे आणि वाढत्या संख्येमुळे आरोग्य प्रणालीसमोर नवीन आव्हाने उभी राहात आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2025 या काळातील ‘हाउसहोल्ड सोशल कंझम्प्शन हेल्थ सर्वेक्षणा’चे आकलन केल्यास सुमारे 13.1 टक्के भारतीयांनी मागील पंधरा दिवसांत कोणत्या ना कोणत्या आजाराची तक्रार केली असल्याचे निदर्शनास येते. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे 15,217 तक्रारी नोंदविल्या असून त्यावरून अनेक जण एकाचवेळी अनेक आजारांचा सामना करत असल्याचे ध्यानात येते. सर्वेक्षणानुसार महिलातील आजारपणाचे प्रमाण (17,006 प्रति लाख) पुरुषांच्या (13,504 प्रति लाख) तुलनेत अधिक आहे; परंतु हृदयाशी संबंधित आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे, विशेषत: शहरी भागात. अहवालातील माहितीनुसार, हृदयाशी संबंधित आजारपण आता देशातील एकूण आजारांत 25.6 टक्के वाटा नोंदवत आहे आणि हे प्रमाण अन्य आजारांच्या तुलनेत अधिक आहे. यात उच्च रक्तदाब, हृदयविकार, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. प्रति एक लाख लोकसंख्येमागे 3358 नागरिक उच्च रक्तदाबाने पीडित आहेत. त्याचवेळी अन्य हृदयविकार असलेल्या रुग्णांची संख्या 533 राहिली आहे. हृदयाशी संबंधित आजारपण वयोमानानुसार वाढत जाते. शून्य ते चौदा वयोगटातील मुलांचे प्रमाण नगण्य असताना 15 ते 29 वयोगटातील मुलांत हे प्रमाण 2.1 टक्क्यांवर पोहोचले आहे. 30 ते 44 वयोगटात हा आकडा 15.2 टक्के, 45 ते 59 वयोगटात 40.1 टक्के आणि 60 पेक्षा अधिक वयोगटात हे प्रमाण 37.8 टक्क्यांवर पोहोचले आहे. हा ट्रेंड पाहता हृदयाशी संबंधित आजारपणाने धारण केलेले गंभीर रूप लक्षात येते. हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल होणार्यांची संख्या वाढली आहे. 15 ते 29 वयोगटातील 3.4 टक्के तरुण हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. 30 ते 44 वयोगटात 7.3 टक्के, 45 ते 59 वयोगटातील 13.9 टक्के आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे प्रमाण 18.2 टक्क्यांवर पोहोचले आहे. 2017-18 पासून ते 2025 या काळात आरोग्यविषयक मोठा बदल पाहावयास मिळाला आहे. एकीकडे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होत ते 2547 वरून 2302 प्रती लाख पोचलेले असताना हृदयविकाराशी संबंधित आजारी लोकांची संख्या 1333 वरून 3891 वर पोहोचली आहे. हा बदल चुकीची जीवनशैली, वाढता तणाव आणि शारीरिक हालचालीत होणारी घट सांगणारा आहे. शहरी भागात हृदयाशी संंबंधित उद्भवणार्या आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक आहे. शहरातील हे प्रमाण एकूण 11.9 टक्के असताना ग्रामीण भागात हे प्रमाण 10.3 टक्के आहे. यावरून शहरी जीवनशैली मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचे दिसते. तणाव, फास्टफूड, व्यायामाचा अभाव आदी गोष्टी हृदयविकाराला चालना देत आहेत. हृदयाशी संबंधित होणारे उपचार देखील महागडे आहेत. शहरी भागात त्याच्या उपचारापोटी येणारा सरासरी खर्च 69,451 रुपये असून तो अन्य संसर्गजन्य, मधुमेह आणि श्वासाशी संबंधित आजाराच्या तुलनेत अधिक आहे. ग्रामीण भागात हा खर्च सरासरी 47,135 रुपये असून ते सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठे आर्थिक ओझे ठरू शकते. अर्थात कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे आणि मस्कुलोस्केलेटल सारखे आजार चिंताजनक आणि खूपच खर्चिक आहेत. तरीही हृदयाशी संबंधित आजारपणाची वाढती व्याप्ती आणि रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यास भारत हा सध्या ‘कार्डिओव्हॅस्कुलर क्रायसिस’च्या उंबरठ्यावर उभा असल्याचे म्हणावे लागेल. प्रामुख्याने तरुणांत वाढत्या आरोग्यविषयक (Health) कुरबुरी आरोग्य तज्ज्ञांच्या चिंतेत भर घालत आहेत. जीवनशैली, खानपान, नियमित तपासणी याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आगामी काळात ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते.