– हेमंत महाजन Energy : युद्धाच्या पारंपरिक सीमा आता पुसट झाल्या आहेत. पॉवरग्रिड आणि इंधनाच्या पंपावरची स्थिरता हे राष्ट्राच्या सामर्थ्याचे मोजमाप ठरत आहे. ऊर्जा (Energy) ही केवळ एक जनसुविधा नसून ती राष्ट्रीय संरक्षणाची आघाडी बनली आहे. 20व्या शतकात, ऊर्जा सुरक्षेकडे केवळ ‘पुरवठा’ या मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले जात असे. 2026 मध्ये ही व्याख्या बदलली असून ती बहुआयामी बनली आहे. आधुनिक ऊर्जा (Energy) सुरक्षेमध्ये उपलब्धता, परवडणारी किंमत, शाश्वतता आणि लवचिकता यांचा समावेश असणे अनिवार्य आहे. जागतिक स्तरावर सध्या ‘ऊर्जा ट्रायलेम्मा’ (The Energy Trilemma) यावर चर्चा सुरूआहे. ज्यात ऊर्जा (Energy) सुरक्षा (विश्वासार्ह पुरवठा), ऊर्जा समानता (सामान्यांना परवडणारे दर) आणि पर्यावरणीय शाश्वतता (कार्बन उत्सर्जन कमी करणे) यांचा समतोल साधला जातो. मात्र, 2026च्या संकटामुळे यात पाचवा महत्त्वाचा आयाम जोडला गेला आहे- लवचिकता. एखादा सायबर हल्ला, लष्करी हल्ला किंवा अचानक आलेली भौगोलिक-राजकीय बंदी यांसारख्या धक्क्यांना पचवण्याची आणि त्यातून सावरून पुन्हा उभे राहण्याची राष्ट्राच्या ऊर्जाप्रणालीची क्षमता म्हणजे लवचिकता होय. आधुनिक ऊर्जासुरक्षा ही भूगोलावर अवलंबून आहे. ‘चोकपॉईंट व्हल्नेरेबिलिटी थिअरी’नुसार, जगातील ज्या अरुंद समुद्रीमार्गांतून ऊर्जेची वाहतूक होते, त्यावर ज्याचे नियंत्रण असते, तो संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला ओलीस धरू शकतो. Energy होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी सर्वात कमकुवत दुवा आहे. कारण भारताची सुमारे 50% एलएनजी आणि 20-25% तेल आयात येथूनच होते. परंतु, आता मलाक्काची सामुद्रधुनी, बाबअल-मंदेब आणि सुएझ कालवा हेदेखील तितकेच महत्त्वाचे बनले आहेत. भारतीय राष्ट्रीय पॉवरग्रिड आता केवळ औद्योगिक विकासाचा कणा राहिलेली नाही; ती चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारील देशांशी सुरू असलेल्या ‘मल्टी-डोमेन’ युद्धातील पहिली आघाडी बनली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील धड्यांनी हे सिद्ध केले आहे की, सीमेवरील संरक्षणा इतकेच पॉवरग्रिडचे डिजिटल संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. डीझेलवर आधारित हालचालींऐवजी आता सायबर युद्ध, एआय आधारित कमांड सिस्टम आणि ड्रोनच्या थव्यांसाठी विजेवर अवलंबित्व वाढले आहे. भविष्यातील युद्धे कमी इंधन लागणारी पण जास्त ‘ग्रिड-डिपेंडंट’ (विजेवर अवलंबून) असतील. जर ग्रिड निकामी झाली, तर आधुनिक लष्कर अंध आणि अर्धांगवायू झाल्यासारखे होईल. भारताचे तेलाचे आयात अवलंबित्व 85-90% आहे. यातील 40% तेलवाहतूक क्षेत्रात वापरले जाते. पुरवठा विस्कळीत झाल्यास महागाई वाढते आणि लष्करी दळणवळण ठप्प होऊ शकते. वायू आयात अवलंबित्व 50% आहे. उद्योगांसाठी वायू महत्त्वाचा असला तरी त्याचा पुरवठा अस्थिर आखाती देशांवर अवलंबून आहे. 70% वीज कोळशातून येते, जी सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. पण पर्यावरण आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे त्यावर दबाव आहे. महत्त्वाची खनिजे हा परावलंबित्वाचा नवीन टप्पा आहे. हरित ऊर्जेकडे वळताना आपण लिथियम, कोबाल्ट आणि निकेलसाठी 100% आयातीवर अवलंबून आहोत, ज्यावर चीनचे वर्चस्व आहे. 2026 मध्ये, युद्धाच्या मैदानात प्रत्येक पॉवर प्लांट, रिफायनरी आणि एलएनजी टर्मिनलचा समावेश होतो. जागतिक संघर्षांनी दाखवून दिले की, ऊर्जा पायाभूत सुविधा हे शत्रूचे पहिले लक्ष्य असते. भारतासाठी जामनगर रिफायनरी, मुंबई हाय आणि नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर्स यांसारखी महत्त्वाची ठिकाणे शत्रूच्या निशाण्यावर असू शकतात- सायबर हल्ले : संपूर्ण ब्लॅकआउट करण्यासाठी ग्रिडचे संतुलन बिघडवणे. ड्रोन हल्ले : डीझेल आणि जेट इंधनाचा पुरवठा रोखण्यासाठी रिफायनरीजवर अचूक हल्ले करणे. अंतराळ हस्तक्षेप : आधुनिक स्मार्ट ग्रिडसाठी आवश्यक असलेल्या उपग्रह समन्वयामध्ये अडथळा निर्माण करणे. बलस्थाने रिफायनिंग हब : भारत जगातील एक मोठे रिफायनिंग केंद्र आहे, ज्यामुळे आपण कच्चे तेल शुद्ध करून निर्यातही करू शकतो. सौर आणि पवनऊर्जा: अक्षय ऊर्जेचा विस्तार आपल्याला घरगुती वीजपुरवठा देतो, जो बंद करणे शत्रूला कठीण जाते. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह : संकटाच्या काळासाठी भारताकडे तेलाचा साठा आहे, जरी तो सध्या 60-62 दिवसांच्या गरजेपुरता मर्यादित असला तरी तो महत्त्वाचा आहे. भविष्यातील उपाय – पुरवठादारांचे वैविध्य : केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता आफ्रिका, अमेरिका आणि रशियाकडून आयात वाढवणे. लष्करी इंधनसाठा : सशस्त्र दलांसाठी स्वतंत्र इंधनसाठा तयार करणे जो नागरी वापरापासून वेगळा असेल. वाहतुकीचे विद्युतीकरण : ईव्ही हे केवळ पर्यावरणासाठी नाही, तरते धोरणात्मक स्वावलंबनासाठी आहे. डीझेलऐवजी कोळसा किंवा सौरऊर्जेवर आधारित वीज वापरल्यास तेलाची गरज कमी होईल. अणूऊर्जेचा विस्तार : गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अणूऊर्जा हा शाश्वत पर्याय आहे. ग्रीन हायड्रोजन : अवजड उद्योग आणि लष्करी वाहतुकीला जीवाश्म इंधनापासून मुक्त करण्यासाठी हायड्रोजन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे.