– बापुसाहेब बा. देशमुख 12 मार्च 2026 रोजी मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची 326 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने… मराठी मुलखातील लढवय्ये व मुत्सद्दी यांना एकत्र करून बलाढ्य औरंगजेबाशी दीर्घकाळ लढा देऊन स्वराज्याचे रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती राजाराम महाराज यांनी पार पाडले. इतकेच नव्हे तर शेवटी आक्रमक धोरण आखून मुघलांना मात दिली. छत्रपतींच्या कार्याची नोंद भारताच्या इतिहासात घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यानंतर रायगडावर युवराज राजाराम यांचा फाल्गुन शु. 3, दि. 9 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. यासाठी महाराणी येसूबाई यांनी पुढाकार घेतला. मुघलांच्या अफाट सैन्याच्या विळख्यात सापडलेले राज्य, विस्कळीत झालेली घडी आणि सततच्या लढायांनी रीता झालेला खजिना अशा बिकट प्रसंगी अवघ्या 19 वर्षांच्या राजारामांवर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आली. त्यांनी संकटांना धैर्याने तोंड दिले. सर्व कर्तबगार सरदार व कारभारी यांना एकत्र आणले व स्वराज्य रक्षणासाठी उत्तेजन दिले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी निर्घृण हत्या केली. या नंतर मराठा साम्राज्य सहज जिंकू असा त्याचा कयास होता. त्याने झुल्फिकार खानास रायगडाकडे रवाना केले. असे काही होणार याची अटकळ मराठ्यांनी आधीच बांधली होती. सुरक्षिततेसाठी राजपरिवाराने एकाच ठिकाणी राहू नये असा विचार रायगडावर झाला. त्यानुसार महाराणी येसूबाई व युवराज शाहू हे रायगडावर राहिले तर छत्रपती राजाराम महाराज कुटुंब कबिल्यासह बाहेर बडले. प्रथम ते प्रतापगडावर आले व तेथून पन्हाळगडावर रवाना झाले. तत्पूर्वीच त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई व राजसबाई या सिंधुदुर्ग येथे पोहचल्या होत्या. इकडे पन्हाळ्यावर राजाराम महाराजांनी औरंगजेबास शह देण्यासाठी मोठी योजना योजली. त्यानुसार ते 26 सप्टेंबर 1689 रोजी निवडक सैन्यासह दक्षिणेत (तामिळनाडूतील जिंजी) जाण्यास निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू व तामिळनाडूतील जिंजी प्रदेश 1677 मध्ये जिंकून दक्षिणेतील स्वराज्याची राजधानी जिंजी येथे स्थापन केली होती. छत्रपती राजाराम महाराजांचा दक्षिणेकडील 700 मैलांचा प्रवास अत्यंत खडतर झाला. दोनदा मुघल सेनेचा हल्ला झाला. परंतु रूपाजी भोसले, संताजी जगताप, मालोजी घोरपडे, खंडोजी बल्लाळ आदी सरदारांच्या मदतीने ते 15 नोव्हेंबर 1689 रोजी जिंजी येथे सुखरूप पोहचले. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी येथे आपला दरबार भरवला. या दरबारामध्ये पाँडेचेरी येथील फ्रेंचांचे वकील, चेन्नई (तेव्हाचे सेंट जॉर्ज फोर्ट) येथील इंग्रजांचे वकील, तंजावर, मदुराई आदी राज्यांचे प्रतिनिधी व अनेक पाळेगार (स्थानिक सरदार) उपस्थित होते. चेन्नईच्या इंग्रज गव्हर्नरने इंग्लंडला लिहिले ‘पुन्नारिहून (पन्हाळा) मराठ्यांचा राजा राजाराम दक्षिणेत आला आहे. त्याने आपला दरबार घेतला. दक्षिणेतील त्यांचे (मराठ्यांचे) सर्व सरदार त्याला येऊन मिळाले आहेत. त्याची (छत्रपती राजाराम) दिल्ली जिंकण्याची मनीषा आहे. या पत्रावरून लक्षात येते की छत्रपती राजाराम महाराजांनी भरवलेला दरबार किती भव्य व सर्वांना स्वराज्य रक्षणाची प्रेरणा देणारा होता. राजाराम महाराजांनी येथून आपले अष्टप्रधान मंडळही नेमले. अशा प्रकारे मराठ्यांचा कारभार आता दक्षिणेतून सुरू झाला. मराठी मुलखाचे स्वामी राजाराम महाराज दक्षिणेत गेल्याची खबर लागताच औरंगजेबाचा तिळपापड झाला. त्याने सुमारे लाखभर सैन्य झुल्फिकार खानास देऊन महाराजांच्या पाठलागावर रवाना केले. त्यामुळे मुघलांची महाराष्ट्रातील शक्ती कमी झाली. त्याचा फायदा मराठ्यांनी उठवण्यास सुरुवात केली. मुघलांनी जिंकून घेतलेले व रसद न आल्याने मराठ्यांनी खाली करून दिलेले किल्ले पुन्हा जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. इकडे झुल्फिकार जिंजी जवळ पोहचला. त्याने जमवाजमव करून किल्ल्यास वेढा दिला. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी भोवती सुमारे 5 मैल लांबीचा तट उभारला होता. त्यामुळे मुघलांना वेढा घट्ट करणे अवघड गेले. हा वेढा पुढे 7 वर्षांपेक्षा जास्त काळ चालला.जिंजी किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात सैन्य वेढा विरळ होता. तेथे वेळोवेळी हल्ला करून मराठा सैन्य आत बाहेर करत रसद पोहचवत असत. त्यातच संताजी व धनाजी यांनी मोगलांची दक्षिणेत येणारी रसद तोडली. वेढ्यावर दोनदा हल्ला करून झुल्फिकार खानास हैराण केले. तसेच त्यांनी बराच दक्षिणेतील प्रदेश मराठा स्वराज्यात सामील करून घेतला. खानास यश येत नाही हे पाहून औरंगजेबाने आपला मुलगा कामबक्ष व वजीर असद खान यांना आणखी सैन्य देऊन जिंजीस रवाना केले. लढून किल्ला मिळत नाही हे जाणून खानाने सन 1697च्या अखेरीस समेटाचा प्रयत्न सुरू केला. इकडे मराठ्यांच्या गोटात छत्रपती राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात जाण्यास हीच योग्य वेळ आहे, असा विचार झाला. 1697 च्या शेवटी छत्रपती राजाराम महाराज निवडक सहकारी घेऊन जिंजीतून बाहेर पडले व 22 फेब्रुवारी 1698 रोजी कोल्हापूर जवळील विशाळगडावर आले. छत्रपती राजाराम महाराजांचे महाराष्ट्रात आगमन झाल्याने मराठी सैन्यात नवचैतन्य संचारले. मोगलांवर लक्ष ठेवण्यास सोईचे म्हणून त्यांनी मराठ्यांची राजधानी 23 मे 1698 रोजी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर स्थापली. महाराजांनी बचावात्मक पवित्रा बदलून आक्रमणाचे धोरण अवलंबले. त्यांनी कृष्णाजी सावंत व नेमाजी शिंदे यांना मध्यप्रदेशाकडे रवाना केले. या मराठा सरदारांनी नर्मदा पार करून मोगलांच्या बुर्हाणपूर शहरावर हल्ला करून दाणादाण उडवली. महाराजांनी 31 ऑक्टोबर 1699 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वारीसाठी प्रस्थान केले. त्यांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्याने 13 नोव्हेंबर 1699 रोजी अहमदनगर जिंकले व मराठवाड्याकडे मोर्चा वळवला. परंतु त्या सुमारास मोगल सरदार हमीदुद्दीन खानाने कराड भागात आक्रमण केले. त्यामुळे महाराजांनी मराठवाडा मोहीम रद्द केली व आपल्या सैन्याचे दोन भाग करून सेनापती धनाजी जाधव यास कराडकडे रवाना केले. धनाजीने हमीदुद्दीनचा दारुण पराभव केला. स्वतः महाराजांनी दुसरी तुकडी घेऊन ब्रह्मपुरीतील (सोलापूर जवळ) औरंगजेबाच्या तळावर हल्ला केला. मोगलांच्या कैदेतील युवराज शाहूंना सोडवण्याचा त्यांचा मानस होता. परंतु तब्येत बिघडल्यामुळे माघार घ्यावी लागली. महाराज प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीसाठी सिंहगडावर आले. तेथे त्यांचा ज्वर बळावला. ताप वाढल्याने व रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचे फाल्गुन वद्य नवमी 1700 रोजी अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले. महाराजांच्या निधन समयी त्यांच्या दोन पत्नी महाराणी ताराबाई व राजसबाई या पन्हाळगडावर होत्या. महाराजांचे अंत्यविधी सिंहगडावर केला. त्या ठिकाणी महाराणी ताराबाई यांनी समाधी बांधली व दरवर्षी पुण्यतिथी साजरी करण्याची व्यवस्था मराठी दौलतीतून करून दिली. अशा या स्थिरबुद्धी, पराक्रमी व महानायक राजाराम महाराज यांच्या कामगिरीस 326व्या पुण्यतिथी निमित्ताने मान वंदना. पुजारी ढमढेरे प्रतिष्ठान व छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती, पुणे यांच्या वतीने त्यांची पुण्यतिथी नियमितपणे सिंहगडावर साजरी करण्यात येते.