नेवासा : निसर्गाच्या सानिध्यात नटलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवार, (दि. ४) रोजी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासून लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. गुरुवारी सकाळी भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. पाच दिवसीय दत्तयागाची सांगता होऊन पूर्णाहुती देण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त ‘दिगंबरा दिगंबरा…श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामगजराने अवघी देवगडनगरी दुमदुमून गेली होती. पहाटे वेदमंत्राच्या जयघोषात महंत भास्करगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशानंदगिरी यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांना महाभिषेक घालण्यात आला. दर्शनासाठी पहाटेपासून लागलेल्या भाविकांच्या रांगा दुपारनंतर मोठ्या दर्शनबारीत रुपांतरित झाल्या होत्या. भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठी तासभराचा कालावधी लागत होता. नेवासा पोलीस पथक, गृहरक्षक दल आणि स्वयंसेवक मंडळाने भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात चोख व्यवस्था ठेवली होती. यावेळी भास्करगिरी महाराजांनी, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या तपोबलामुळे हे स्थान भाविकांचे श्रध्दास्थान बनल्याचे सांगून, “भगवान दत्तात्रय आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत आणि व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दु:खी असू नये,” असा शुभाशिर्वाद दिला. दत्त जयंतीनिमित्त मुख्य मंदिरासह किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिध्देश्वर मंदिर, तसेच प्रवेशद्वारावरील भव्य विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी महामंडळाने अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नेवासे, गंगापूर, श्रीरामपूर आगारातून जादा बसेसची व्यवस्था केली होती. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती, परंतु स्वयंसेवक आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभर परिश्रम घेतले. श्रीक्षेत्र देवगड येथील निसर्गरम्य, स्वच्छ परिसर आणि प्रवरा नदीचे वाहते पाणी भाविकांच्या आनंदाला द्विगुणित करत होते.