हिंगोली : अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण देशात नवसाच्या मोदकासाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी शनिवारी (दि. ६) दिवसभरात लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. संस्थान व पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह स्वयंसेवक तैनात करण्यात आले. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तीन ते चार ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले होते. याशिवाय बसण्यासाठी खुर्च्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हिंगोली तील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी मोदक घेण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली या भागातून भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी संस्थांच्या वतीने दररोज नवसाचे मोदक वाटप करण्यात आले. आज (दि. 06) पहाटे चार वाजता आरती करून गणपतीच्या दर्शनाला सुरुवात करण्यात आली. यावर्षी सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज संस्थांच्या वतीने व्यक्त केला. दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, नाश्ता भोजनाची व्यवस्था दानशूर तसेच विविध मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा विदर्भातील भाविकांनी नवसाचे मोदक घेण्यासाठी गर्दी केली होती. हनुमान मंदिरापासून दर्शनाची रांग सुरू संकट मोचन हनुमान मंदिरापासून रांगेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक मेडिकल, लाईन जुने ग्रामीण पोलीस ठाणे, मारवाड गल्लीतून भागातून दर्शन रांग मंदिरापर्यंत होती. 600 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर परिसरात आज ४०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी व गृह रक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. याशिवाय शंभर पेक्षा अधिक स्वयंसेवक मदतीला राहणार आहे.