लखीमपूर हिंसा ! नेता झाल्याने, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडता येणार नाही; भाजपला घरचा आहेर

लखनौ – भारतीय जनता पक्षाचे उत्तरप्रदेश शाखेचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनीच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर आणि मंत्र्यावर जाहीर टीका करीत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. आपण राजकीय नेते आहोत म्हणून आपल्याला फॉर्च्युनर गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडता येणार नाही असा जाहीर समज त्यांनी मिश्रा पितापुत्रांना दिली आहे.
रविवारी पक्षाच्या अल्पसंख्याक प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही सुचना केली. त्यांनी मंत्र्यांचे नाव घेतले नाही. पण ते म्हणाले की राजकारणात तुम्ही कसे वागता यावरच निवडणूका जिंकता येतात.
तुम्ही राजकीय नेते आहात म्हणून तुम्हाला लुट करता येणार नाही. तसेच तुम्हाला आपली गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडता येणार नाही. आपण या पक्षात लोकांची सेवा करण्या करीता कार्यरत आहोत.
राजकारण हा पार्टटाइम जॉब नाही हेही लक्षात घ्या अशा कानपिचक्याही त्यांनी भाजप नेत्यांना दिल्या. दरम्यान या भाषणात ते पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करण्यासही विसरले नाहीत.





