‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत दिलेले पैसे सक्तीने परत घेणार का? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात. लवकरच ही रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार आहे. मात्र, अनेक अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर सरकारकडून अर्जांची छाननी सुरू झाली आहे.
अनेक महिलांनी निकषांमध्ये बसत नसल्याने अर्ज मागे घेतले आहेत. तसेच, निकषात बसत नसल्याने अनेक महिलांचे अर्ज देखील बाद केले जात आहेत. त्यामुळे निकषांमध्ये बसत नसतानाही ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले, ते परत घेतले जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
निवडणुकीच्या काळात महिलांना सरसकट या योजनेंतर्गत पैसे देण्यात आले. मात्र, अनेक अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या पैशांचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सरकार दिलेले पैसे परत घेणार यामुळे अनेक महिला योजनेतून बाहेर पडत आहेत. मात्र, सरकारने रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी याबाबत सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत’
या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच, लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नसल्याचे देखील महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





