राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे. दरम्यान, जर 18 नोव्हेंबर नंतरही अनेक जण केवायसी करयाचे राहिले, तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार सोमवारी – निधी वितरित करण्यास गृह विभागाची मंजुरी- राज्य सरकारने एसटी महामंडळाला सवलतमूल्याचा निधी न दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात पगार जमा होऊ शकलेला नाही. दर महिन्याच्या ७ तारखेला कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. परंतु, सवलतमूल्याची रक्कम मिळण्यास विलंब झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला. आता राज्य सरकारने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२५ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७१.०५ कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारी पगार जमा होईल, अशी माहिती मिळाली आहे. पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय- शरद पवार- सरकारने चौकशी करून वास्तव समाजापुढे ठेवावे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा एक गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. पार्थ पवार हे 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल महिन्याभरात आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ – चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते. २ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती, असा पोलिसांचा आरोप आहे. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. आळंदी कार्तिकी यात्रेसाठी वाहतुकीत मोठे बदल- 12 ते 20 नोव्हेंबरदरम्यान वाहनांना प्रवेशबंदी – श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. ही यात्रा १२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान भरणार आहे. विशेषतः १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आणि १७ नोव्हेंबर रोजी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा असल्याने महाराष्ट्रातून आणि देशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तसेच आळंदी आणि देहूगाव येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. दैनिक प्रभातच्या संकेतस्थळावर याची सविस्तर बातमी पहा. महामार्ग, रुग्णालये, रेल्वे स्थानकांवरील भटके श्वान हटवा – सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित प्रशासनांना आदेश – शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे आणि रेल्वे स्थानके अशा संस्थात्मक क्षेत्रांमधील भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमधील वाढ चिंताजनक आहे. अशा ठिकाणांहून भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनांना दिले. तसेच महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून भटक्या प्राण्यांना हटविण्याचे आदेशही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाने दिले. राजधानी दिल्लीत भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे विशेषत: मुलांमध्ये रेबिज होण्याबाबतच्या वृत्तावरून २८ जुलै रोजी स्वत:हून दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबरपर्यंत – संपूर्ण अधिवेशनात होतील १५ बैठका – संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होईल आणि १९ डिसेंबर २०२५ पर्यंत चालेल. संपूर्ण अधिवेशनात १५ बैठका होतील, अशी घोषणा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली. रिजिजू म्हणाले, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.” संसदेचे मागील पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्ट पर्यंत चालले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधील एसआयआरवर चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधकांच्या निदर्शनांमुळे संपूर्ण अधिवेशन विस्कळीत झाले होते. मधुमेह, लठ्ठपणा असणऱ्यांसाठी अमेरिकेची दारं बंद? डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे व्हिसा संदर्भातील नियम कडक – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या नव्या नियमानुसार विदेशी नागरिकांनी अमेरिकेत वास्तव्यासाठी व्हिसासाठी अर्ज केल्यास आणि ते मधुमेह, लठ्ठपणा आणि ह्रदय विकार या सारख्या आजारांनी ग्रस्त असतील तर त्यांचा व्हिसाचा अर्ज नाकारण्यात येऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. न्यूज रिपोर्टनुसार मार्गदर्शक सूचना उच्चायूक्त कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. व्हिसा अधिकाऱ्यांनी व्हिसा अर्ज मंजूर करताना अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करावा असंही सांगण्यात आलं आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचे लग्न- रश्मिका योग्य ठिकाण निवडण्यासाठी उदयपूरला – अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. पूर्वी असे वृत्त होते की, त्यांचा साखरपुडा झाला आहे आणि ते फेब्रुवारीमध्ये लग्न करतील. आता असे म्हटले जात आहे की, त्यांचे लग्न उदयपूरमध्ये होईल. या कारणास्तव, रश्मिका योग्य ठिकाण निवडण्यासाठी उदयपूरला गेली. वृत्तानुसार, रश्मिका अलीकडेच उदयपूरमध्ये आली आणि तिने संभाव्य लग्नाच्या ठिकाणांना भेट दिली. तिने शहरात तीन दिवस घालवले, विविध ठिकाणांची कसून तपासणी केली. तथापि, तिने कोणतेही ठिकाण बुक केले आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, असाही दावा केला जातोय की, हे जोडपे पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. हे लग्न दक्षिण भारतीय आणि राजस्थानी परंपरेनुसार होईल. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. भारताचा ऑस्ट्रेलियावर २-१ ने मालिका विजय- पावसामुळे अखेरचा पाचवा सामना झाला रद्द- गाबा येथे पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा, पाचवा सामना रद्द झाला. ज्यामुळे भाराताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत निर्णायक आघाडी घेतली. हा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सलग चौथा द्विपक्षीय टी-20 मालिका विजय ठरला आहे, ज्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियावर भारताचे वर्चस्व कायम राहिले आहे.