Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ई- केवायसी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर शासनाने दुरुस्तीसाठी दि. ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत जाहीर केली आहे. सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ई- केवायसी करताना सुमारे ८५ हजार ६४ महिलांकडून पर्याय निवडताना चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी ७८ हजार २५५ महिलांची दुरुस्ती अधिकृत पोर्टलवर पूर्ण झाली असून त्या महिलांचा योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधलेल्या सर्व महिलांच्या केवायसी दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे. अद्याप दुरुस्ती न केलेल्या महिलांनी तात्काळ अधिकृत पोर्टलवर प्रक्रिया पूर्ण करावी किंवा नवीन प्रशासकीय इमारतीतील (दुसरा मजला, एस.टी. स्टँडजवळ, पारंगे चौक, सातारा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ई-केवायसी दरम्यान, आधार नोंदीनुसार वय ६५ वर्षांपेक्षा अधिक झालेल्या ११ हजार ५५३ महिलांचा लाभ शासनाने थांबवला आहे. तसेच २१ वर्षांखालील ४५६ महिलांचा लाभही स्थगित करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आधारवरील जन्मतारखेत चूक असल्यास शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र सादर करून लाभ पुन्हा सुरू करता येणार आहे. शासनाने यापूर्वी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ईकेवायसी दुरुस्तीसाठी मुदत दिली होती. आता दि. ३० एप्रिलपर्यंत अंतिम संधी देण्यात आली असून ही सुविधा केवळ ईकेवायसी करताना चुका झालेल्या महिलांसाठीच लागू आहे. ज्यांनी अद्यापही ईकेवायसी केलेली नाही, त्यांना कोणतीही नवीन संधी देण्यात आलेली नसून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. प्रलंबित लाभार्थ्यांनी ईकेवायसी तातडीने दुरुस्ती करून योजनेचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ३४९ महिलांची पुरुष म्हणून नोंद… ३४९ महिला लाभार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये लिंग ‘पुरुष’ अशी चुकीची नोंद आढळल्याने त्यांचा लाभही रोखण्यात आला असून त्या महिलांनी तात्काळ आधार दुरुस्ती करून प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.