सातारा, (प्रतिनिधी) – महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे; परंतु निवडणूक आयोगाने सूचना केली, म्हणून ही योजना बंद केल्याचे सत्ताधारी खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली येथील काँग्रेस भवनामध्ये आ. चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आणि जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज बंद झाले आहेत. मुळात ही योजना धादांत खोटी आहे. आर्थिक टंचाईमुळे म्हणजे राज्याच्या तिजोरीत पैसे शिल्लक नसल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे; परंतु आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन, ही योजना बंद झाल्याचे राज्य सरकार सांगत आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना का फसवले, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे. महाविकास आघाडीची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर होत असून, यामध्ये आम्हाला पुरेशा जागा मिळाल्या आहेत. जागावाटपाचे निर्णय सुरू आहेत. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दोन दिवसांनंतर भरले जाणार आहेत. त्याकरिता पक्षाचे दोन निरीक्षक महाराष्ट्रात मुक्कामी आहेत. कराड दक्षिणसह सातारा जिल्ह्यात कोणत्या जागांची मागणी काँग्रेसने केली आहे, या प्रश्नावर आ. चव्हाण यांनी मौन बाळगले. आजची लढाई विचारधारेची आहे. पैशाचा अतोनात वापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु आपले हित कशात आहे, हे लोकांना चांगले कळते. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार आहे. काँग्रेस पक्ष जो वचननामा काढतो, त्यानुसार कामे करतो. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात आम्ही जी वचने दिली होती, ती कामे करण्याच्या तेथील विद्यमान सरकारांचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास, त्यांच्यामागे पुन्हा ईडीची चौकशी लावली जाईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, ईडीची यंत्रणा भ्रष्टाचारी सत्तेसाठी वापरली जात आहे. केंद्र सरकार सत्तेच्या बळावर या यंत्रणेचा वापर करत आहे. अलीकडच्या काळात हा कायदा वापरून, राजकीय मंडळींना तुरुंगात घालण्याचे उद्योग सुरू आहेत. आम्ही पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो; परंतु आता ईडीची सक्तीची कारवाई आम्ही चालू देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.