Pune : रेल्वे सुरक्षा दलाकडे मनुष्यबळाची कमतरता

पुणे : पुणे रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) आधीच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यात पुणे रेल्वे विभागात दौंड, नगरचा भागही समाविष्ट करण्यात आला. या विभागाचा विस्तार थेट बीड जिल्ह्यांपर्यंत जाऊन पोहचला. त्यामुळे “आरपीएफ’ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची मोठी कसरत होते. त्यामुळे आता महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेतील पुणे रेल्वे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात दौंड, अहिल्यानगर (अहमदनगर) भाग नव्याने समावेश झाला आहे. पुणे रेल्वे विभागात रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) आजही ९८ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात नव्याने भाग आल्यामुळे काम करताना अनेक अडचणी येतात. कर्मचाऱ्यांची धावपळ होते. असा परिस्थितीत अनेक छोट्या-मोठ्या रेल्वे स्थानकावर एकही “आरपीएफ’ कर्मचारी नसतो.
त्यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे रेल्वे विभागात पुणे रेल्वे स्टेशन हे सर्वांत मोठे स्टेशन आहे. या ठिकाणी देखील “आरपीएफ’ला कर्मचारी कमी पडत आहेत. तातडीने “आरपीएफ’चे जवान मिळणे शक्य नाही. त्यामुळे पुणे “आरपीएफ’कडून महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे ४१ जवान देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. या जवानांचा उपयोग प्रवासी व्यवस्थापन, गस्त घालणे, पार्किंग व्यवस्थापन अशा कामांसाठी केला जाणार आहे.
अशी आहे आकडेवारी
आरपीएफचे सध्याचे मनुष्यबळ – ५४६
आरपीएफचे रिक्त मनुष्यबळ – ४८
महाराष्ट्र सुरक्षा दलाचे घेतले जाणारे कर्मचारी – ४१





