प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका बांधकाम साईटवर सहाव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. सुरक्षा जाळी आणि सेफ्टी बेल्ट निकृष्ट दर्जाचे असल्याने हा अपघात घडला. ही घटना दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ऑस्टोरीया रॉयल्स बांधकाम साईट, बी.आर.टी. रोड, रावेत येथे घडली.विक्रम कुमार यादव असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणात सत्यदेव रवेश दास (वय २१, सध्या रा. रावेत, मूळ रा. बिहार) यांनी रविवारी (दि. ४) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार आरोपी सतेंद्र शिवेश्वर दास (वय ३४, रा. च-होली, ता. हवेली, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र विक्रम कुमार यादव हा माय वन सेंट्रींगच्या प्लेट जोडण्याचे काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो डक्टमध्ये पडला. त्यावेळी त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो सहाव्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर पडला. मात्र, जाळी निकृष्ट दर्जाची असल्याने ती फाटली आणि विक्रम थेट खाली पडला. डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुरेशी सुरक्षा खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.