मुंबई : देशात गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे लोकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. सध्याची टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. हे चोरटे याच टेक्नॉलॉजीच्या मदतीने विविध मार्गांचा वापर करून लोकांची फसवणूक करत असतात. अलीकडच्या काळात KYC च्या नावाखाली हे चोरटे लोकांची फसवणूक करताना दिसतात. तर आज आपण ही फसवणूक कशी होते? त्यापासून वाचण्यासाठी काय करावे? हे जाणून घेणार आहोत. कशाप्रकारे होते फसवणूक? सायबर फसवणूक करणारे कोणाच्या तरी पर्सनल माहितीच्या किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे फेक अकाउंट तयार करतात. या अकाउंटवरून ते बेकायदेशीर व्यवहार करत असतात. तसेच ते कोणाच्या फोटोशी छेडछाड करून किंवा कोणाची वैयक्तिक माहिती गोळा करून आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बनावट कागदपत्रे तयार करतात. त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या अकाउंटवर बेकायदेशीर कामे करत असतात. याची सामान्य माणसाला कल्पनादेखील नसते. मात्र याचा त्रास त्या खातेधारकाला भविष्यात होतो. ‘या’ फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावे? वाढत्या सायबर गुन्ह्यांमध्ये लोकांनी सतर्क राहणे खूप महत्वाचे असते. जर कोणी तुम्हाला अकाउंट डिटेल्स किंवा केवायसीशी संबंधित माहिती विचारत असेल, तर त्याच्या संस्थेकडून पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका. कोणतीही बँक किंवा इतर संस्था त्यांच्या ग्राहकांकडून ओटीपी, पासवर्ड आणि पिन क्रमांक मागत नाही हे लोकांनी सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. आजकाल पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पर्सनल माहिती विचारण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा कोणत्याही कॉल दरम्यान धीर धरा आणि पर्सनल माहिती शेअर करू नका. तसेच अनव्हेरिफाय सोर्सकडून कोणतेही ॲप डाउनलोड करू नका आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आधार आणि पॅन क्रमांक इत्यादी गोष्टी शेअर करू नका अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच जर तुमची फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यास सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल किंवा सायबर क्राईम हेल्पलाइनशी तुम्ही संपर्क करू शकता.