Kunal Kamra : कुणाल कामराने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव; FIR रद्द करण्याची केली मागणी

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि राजकीय वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करून वादात अडकलेल्या कामराविरोधात आता एफआयआर दाखल करण्यात आलेला असताना, कामराने आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कामराने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, ती एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर उद्या, मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी कामरा याने संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे कामरा याची याचिका वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी सादर केली.
तसेच, कामरा याच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने याच कारणास्तव अंतरिम संरक्षण दिले आहे. त्यामुळे, आम्ही अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करत नसल्याचेही कामरा याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर, कामरा याच्या जीवाला धोका आहे या तुम्ही दिलेल्या कारणास्तव आम्ही त्याच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊ. परंतु, अंतरिम संरक्षणासाठी तुम्ही संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी. आम्ही हा मुद्दा अजिबात ऐकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, कामरा याच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी निश्चित केली.





