नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतंर्गत सिंचनाच्या प्रकल्पांसंबंधी आणि विविध प्रलंबित कामांना गती मिळणार आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी पाइपलाइन प्रकल्प, बुडीत, केटी बंधारे, वितरिका साफसफाई व दुरूस्ती, कालवा पोटचाऱ्या पूर्ण करणे, प्रकल्पबाधितांचे विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधित अनेक विषयांवर मंगळवारी (दि. 17) सिंचन भवन येथील आयोजित बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, संभाजी माने, कुकडी कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, सुचिता डुंबरे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, अशोक घोडके, प्रदीप पिंगट, सुरेश तिकोणे उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, पिंपळगाव जोगा कालव्याची दुरूस्ती, शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी पूल बांधणे, कालव्याच्या वितरिका व लघु वितरिका, नवीन आऊटलेट काढणे, बेल्हे येथील प्रस्तावित एस्केप, सीआर गेटचे काम त्वरित सुरु करण्याबाबत मान्यता मिळाली आहे. नवीन पाणी परवान्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन पूर्व भागातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
चिल्हेवाडी पाइपलाइनच्या आराखडा व लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी सुचविण्यात आलेले सकारात्मक बदल मान्य केले आहेत. माणिकडोह धरणातील 8 पैकी 3 बुडीत बंधाऱ्यांच्याबाबत प्राधान्याने तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये चावंड, जळवंडी व अंजनावळे या बंधाऱ्यांचे प्रस्ताव प्राधान्याने घेण्यात येणार आहेत.
रामजेवाडीच्या आऊट लेटच्या कामासाठी व निरगुडे, बेलसर कोल्हापूर पद्धती बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. ओतूर येथील वाघदरा लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे.