Pune District : चिंबळी-मोशी हद्दीतील के.टी. बंधारा कमालीचा दुरवस्थेत
Pune District : बंधार्याच्या दोन्ही बाजूंचे पाणी काळपट झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठीही घातक ठरण्याची शक्यता आहे.

चिंबळी : चिंबळी आणि मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीवर असलेला महाराष्ट्र शासनाचा के.टी. (कोल्हापूर पद्धतीचा) बंधारा गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरवस्थेत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा बंधारा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे परिसरातील शेती तसेच नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधार्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक व शेतकर्यांकडून होत आहे.
इंद्रायणी नदीवरील हा बंधारा चिंबळी, मोशी तसेच परिसरातील गावांच्या शेतीसाठी आणि पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. मात्र, बंधार्याचे लोखंडी दरवाजे सडले असून भिंती तसेच गाळ्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी बंधार्यात पाणी अडवून ठेवणे कठीण झाले असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. उन्हाळ्यात किंवा ऐन गरजेच्या काळात नदीतील पाणी टिकून राहत नसल्याने शेतकर्यांना सिंचनासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंधार्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित पाटबंधारे विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकार्यांना ग्रामस्थांकडून वारंवार निवेदने देण्यात आली आहेत.
मात्र, प्रशासनाकडून आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाचा महत्त्वाचा जलसाठा प्रकल्प असूनही त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने गावकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंधार्याच्या दोन्ही बाजूंचे पाणी काळपट झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठीही घातक ठरण्याची शक्यता आहे. बंधार्यातील गाळे व मोर्यांमध्ये लाकडे तसेच कचरा अडकल्याने पाण्याच्या प्रवाहावरही परिणाम होत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छता व दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येत्या पंधरा दिवसांत बंधार्याच्या दोन्ही बाजूंचे सिमेंटचे काम करण्यात येणार असून, पाणीगळती थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तसेच मोर्यांमध्ये अडकलेले लाकूड व कचरा काढून टाकण्यात येईल.
-सचिन गोळपे, पाटबंधारे विभाग





