Kshitee Jog : तब्बल 6 वर्षांनी क्षिती जोग करणार छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ मालिकेच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सध्या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मालिका उत्तम सुरु आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या उत्कंठेचा कळस गाठत आहे. अर्जुनच्या न्यायाच्या लढाईत नवनवीन अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. साक्षी आणि महिपतच्या कारस्थानांचा पर्दाफाश करण्यासाठी अर्जुन झटताना दिसत आहे. यादरम्यान या मालिकेत अर्जुनच्या विरोधात एका तगड्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही अभिनेत्री (Kshitee Jog) नेमकी कोण ? त्याबाबद्दल जाणून घेऊया…
क्षिती जोगची होणार एन्ट्री
महिपतने आता साक्षीची केस लढण्यासाठी नामांकित वकील दामिनी देशमुख यांची मदत घेतली आहे. तिच्या जोरदार युक्तिवादांमुळे अर्जुनची लढाई अधिक कठीण होणार आहे. दामिनी देशमुख ही फक्त हरवण्यासाठी लढत नाही, तर ती जिंकण्यासाठी मैदानात उतरते! त्यामुळे प्रेक्षकांसाठी आता अर्जुन विरुद्ध दामिनी देशमुख असा एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. या दमदार वकिलाची भूमिका अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) साकारणार आहे. एवढंच नाहीतर तब्बल 6 वर्षांनी क्षिती जोग छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
भूमिकेविषयी काय म्हणाली क्षिती जोग ?
“‘ठरलं तर मग’ ही संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. मी स्वतःही ही मालिका खूप आवडीने पाहते. आता या मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाली आहे, याचा मला खूप आनंद आहे. दामिनी देशमुख ही एक परखड आणि बुद्धिमान वकील आहे. ती फक्त विरोधकांना हरवण्यासाठी कोर्टात जात नाही, तर स्वतःच्या विजयासाठी लढते. तिच्या तडफदार स्वभावामुळे ही भूमिका साकारताना एक वेगळीच मजा येईल.” असे क्षिती जोग म्हणाली.
क्षिती जोग बद्दल बोलायचे झाले तर क्षिती (Kshitee Jog) सध्या बहुतेक मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट-वेबसीरिजमध्ये पाहायला मिळते. ती २०१९ साली शेवटची ‘ह.म. बने, तु.म. बने’ या मालिकेत दिसली होती. तब्बल सहा वर्षांनी क्षिती मालिका विश्वात पुनरागमन करत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील तिला पाहायला उत्सुक आहेत.





