बॉलिवूडची लोकप्रिय व प्रतिभावान अभिनेत्री कृति सेननने नुकताच रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा गुंतवणुकीचा सौदा केला आहे. तिने मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित भागांपैकी एक असलेल्या पाली हिल, बांद्रा येथे तब्बल 78.20 कोटी रुपयांचा सी-फेसिंग डुप्लेक्स पेंटहाऊस विकत घेतला आहे. हे नवे घर ‘सुप्रीम प्राणा’ या आलिशान रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये आहे. पेंटहाऊस 14 व 15 व्या मजल्यावर असून त्यातून थेट समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं. एकूण 7,302 चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या या डुप्लेक्ससोबत कृतिला 6 कार पार्किंग स्लॉट्सही मिळाले आहेत. प्रति चौ.फुट सुमारे 1.18 लाख रुपये एवढी किंमत असल्याने ही उपनगरीय मुंबईतील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक मानली जात आहे. या घराची नोंदणी 14 ऑगस्ट 2025 रोजी झाली. महिला खरेदीदार म्हणून कृतिला स्टॅम्प ड्युटीत 1% सूट मिळाली आहे. तिने यासाठी 3.91 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. अधिकृतरित्या कृतिने या खरेदीबाबत काही भाष्य केलेले नसले तरी मालमत्तेची कागदपत्रे या व्यवहाराची पुष्टी करतात. याआधी, जुलै 2024 मध्ये कृतिने अलीबागमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा 2000 चौ.फुटांचा सुंदर समुद्रदृश्य असलेला प्लॉट घेतला होता. हा प्लॉट ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोधा’ प्रोजेक्टचा भाग असून येथे अमिताभ बच्चन यांसारखे अनेक नामांकित कलाकारांनीही गुंतवणूक केली आहे. वर्कफ्रंटवर, कृति सेनन लवकरच ‘कॉकटेल 2’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती धनुषसोबत ‘तेरे इश्क में’ आणि रणवीर सिंगसोबत ‘डॉन 3’ सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे. यामुळे अभिनयासोबतच कृति आता रिअल इस्टेट क्षेत्रातही चर्चेत आली आहे.