आज मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे पण मराठी शाळांचे भवितव्य काय ? मराठी शाळा टिकणार कि नाही ? आपण स्वतः किती आपल्या मराठी भाषेवर प्रेम करतो ? मराठी शाळेची पटसंख्या कशी वाढणार ? या आणि इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न आणि प्रेक्षकांना विचार करायला आणि अंतर्मुख करणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे चा क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट…. अलिबाग येथील नागाव ला असणारी क्रांतिज्योती विद्यालय हि मराठी शाळा. 90 वर्षांपासून उभी असणारी मराठी शाळा आता नवीन इंटरनॅशनल इंग्रजी शाळा बांधायची म्हणून पाडली जाणार आहे.या घटनेने व्यथित झालेले शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर ) आपल्याच शाळेतील माजी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावतात आणि आपली व्यथा त्यांच्या समोर मांडतात.. सरळ मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून शाळा वाचवणे हे एकमेव ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे हे ते विदयार्थ्यांना सांगतात. खरे तर हा प्रश्न महाराष्ट्रातील समस्त मराठी शाळांचा आहे. आज हि व्यथा प्रत्येक मराठी शाळेची आहे आणि हि व्यथा प्रभाविपणे पडद्यावर मांडण्याचे काम हेमंत ढोमे यांनी प्रबोधना मार्फत योग्य रीतीने पार पाडले आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला टाकू शकतो का मराठी शाळेत ? मराठी शाळेतील मुलांचा या जीवघेण्या स्पर्धेत निभाव लागू शकतो का? या इंग्रजाळलेल्या आधुनिक शाळांमध्ये कुणीही शिर्के सर तुम्हाला आढळणार का ? असे बोचरे प्रश्न या विद्यार्थ्यांना पण पडतात.. शिर्के सरांचे विद्यार्थी आपल्या आपल्या क्षेत्रात स्थिरावलेले आणि यशस्वी पण असतात.शिर्के सरांसारखे जीव लावणारे शिक्षक, त्यांचे संस्कार आणि लहानपणापासून मराठी शाळेचं बाळकडू याची फलश्रुती म्हणूनच त्यांना प्राप्त झालेले यश याची विद्यार्थ्यांना जाणीव असते.शिर्के सर आणि त्यांचे विद्यार्थी शाळा वाचवण्यात यशस्वी होतात का हे पडद्यावर पाहणे अतिशय रंजक ठरतं. उत्कृष्ट संवाद हा या चित्रपटाचा प्राण आहे.. काही ठराविक संवाद आपल्या मनात घर केल्याशिवाय राहत नाहीत. कलाकारांचा सशक्त अभिनय हि त्यात जमेची बाजू…सचिन खेडेकर चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांनी ती भूमिका समर्थपणे निभावली आहे. क्रांतीची ज्योत सगळ्यांच्या मनात तेवत ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. नार्वेकर बाईंच्या भूमिकेत निर्मिती सावंत शोभून दिसतात आणि सहज पणे वावरतात. पण खरी मजा आणली आहे सरांच्या विद्यार्थ्यांनी. प्राजक्ता कोळी जिनिव्हा इथे राहणारी संशोधिका पण गावातील झाडांमध्ये आणि फुलांमध्ये रमणारी, हरीश दुधाडे वकिली सोडून आधुनिक शेती करणारा आणि मातीशी घट्ट नाळ जोडणारा, दुबई आणि बँकॉक इथे हॉटेल व्यावसायिक असणारे दांपत्य म्हणजे कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपूटकर पण शाळेसाठी भरघोस मदत करण्यासाठी तत्पर. सिद्धार्थ चांदेकरचा कुलदीप मात्र भाव खाऊन जातो.प्रसिद्ध अभिनेता म्हणून नावारूपाला आलेला कुलदीप ज्या शाळेच्या स्टेज नी त्याला ओळख दिली त्या शाळेला वाचवण्यासाठी सोशल मीडिया चा बखुबी वापर करतो. सलमा अंतूले या अनाथ मुलीच्या भूमिकेत क्षिति जोग लक्षात राहते. उच्चपदस्थ सरकारी अधिकारी म्हणून ती तिच्या पदाचा योग्य वापर करून घेते. पण खऱ्या अर्थाने लक्षात राहतो तो बबन (अमेय वाघ).. अमेयने आगरी भाषेचा सहसुंदर वापर केला आहे. तो अगदी पक्का आगरी वाटतो इतकी बबन हि भूमिका त्याने समरसून केली आहे आणि आपल्या मातृभाषेचा प्रचंड अभिमान असलेला प्रामाणिक कंत्राटदार अप्रतिम वठवला आहे. त्याचे भाषण आपल्याला नकळत भावुक करून जातं.आपल्या मुलाला मराठी शाळेतच शिकवायचं हा हट्ट लावून धरणारा बबन खूप जवळचा वाटतो. जितेंद्र जोशी शिक्षण मंत्री म्हणून अगदी योग्य वाटतो.. शाळेच्या जागेवर कब्जा करणारा बेरकी बांधकाम व्यावसायिक म्हणून नेहमीप्रमाणे अनंत जोग शोभले आहेत. चित्रपट पाहताना आपण सुद्धा नकळत पणे आपल्या मराठी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात रमुन जातो हेच या चित्रपटाचे यश आहे. या सगळ्या विदयार्थ्यांना शाळेतील जुने दिवस, जुन्या जागा, जुनी लोकं या निमित्ताने सगळं आठवतं.त्या जुन्या लोकांना भेटल्यावर, त्या जुन्या स्थळांना भेटी दिल्यावर तर आपली शाळा कसेही करून वाचवायची हा ठाम निर्धार ते करतात. शिर्के सरांचे चित्रपटातील जितेंद्र जोशी सोबत केलेले शेवटचं आवाहन मात्र अस्वस्थ करतं आणि अनेक प्रश्न उपस्थित करतं ज्याची उत्तरं आपण शोधू लागतो.आज मराठी शाळा वाचवण्याचे मोठं आव्हान आपल्यासमोर, राज्यकर्त्यासमोर, शासनकर्त्यासमोर आहे आणि आपण मराठी म्हणून हे दायित्व स्वीकारतो का याचा आरसा दाखवण्यात हेमंत ढोमे यशस्वी झाले आहेत..अशीच काहीशी परिस्थिती आपल्या मराठी सिनेमांची पण आहे.. पुरेसे खेळ अथवा थिएटर ची आणि प्रेक्षकांची वानवा मराठी सिनेमाला नवीन नाही. याउलट दाक्षिणात्य सिनेमांची परिस्तिथी आहे आणि अतिशय आशावादी चित्र आहे.तिथे चित्रपटांना लोकं अक्षरशः डोक्यावर घेतात. तर आपल्या मराठी भाषेचा, मराठी असण्याचा अभिमान म्हणून तरी मराठी चित्रपट पाहणे गरजेचे आहे. चला तर मग आपल्या मराठी शाळेत……क्रांतीची ज्योत हातात घेऊन… राहुल सराफ