पुणे – मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला शंभर रुपये न दिल्याने एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुणाचा पंजा मनगटापासून तुटला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तुटलेला पंजा पिशवीत भरुन तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आंबेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलाने कोयता घेऊन दिसेल त्याच्यावर वार केले होते. ही घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला.
या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तर त्यांचा साथीदार गौरव गौतम मानवतकर (वय 18, रा. सुतारवाडी, पाषाण) याला अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अद्याप फरार आहे.
या प्रकरणी आशुतोष अर्जुन माने (वय 24, रा. दुर्वांकुर सोसायटी, पंचवटी, पाषाण) याने फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मानेचा मित्र पंकज अनंत तांबोळी (वय 25, रा. पाषाण) याचा डावा हात मनगटापासून कापला गेला आहे.
फिर्यादी आशुतोष मुळाच सांगलीचा आहे. तो दोन महिन्यांपूर्वी पाषाण येथे सी-डॅक संस्थेत कोर्स करण्यासाठी आला आहे. त्याच्या सोबत पंकज हाही सी-डॅकचा कोर्स करत आहे. 31 डिसेंबरला रात्री त्यांची खाणावळ बंद होती. यामुळे संस्थेतील चौघे जण जेवणासाठी साई चौकात आले होते. जेवण करुन हॉटेल बाहेर थांबले असता रात्री सव्वा एकच्या सुमारास दुचाकीवरुन दोघे आरोपी आले. त्यांनी पंकजला 100 रुपयांची मागणी केली. मात्र पंकजने त्यांना विरोध केल्याने त्यांनी फोन करुन आणखी दोघांना बोलावून घेतले.
पाठीमागून आलेल्या एका मुलाने त्याच्या हातातील कोयत्यासारख्या हत्याराने पंकजच्या डाव्या हातावर वार केला. यामध्ये त्याचा पंजा मनगटापासून तुटून रस्त्यावर पडला. पंकजचा पंजा खाली पडलेला पाहून जमलेल्या नागरिकांनी तेथून पळ काढला. दरम्यान, थोड्या वेळाने तेथे आलेल्या पोलिसांनी पंकजला रिक्षातून रुग्णालयात नेले.
चार तासांत आरोपी ताब्यात
पोलीस उपनिरीक्षक नीलेश महाडिक यांनी सांगितले, की आम्ही रात्रीपाळीत कामाला होतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेतला. यातील तीन आरोपींना अवघ्या चार तासांत सुतारवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यातील दोघे अल्पवयीन असून, अटक आरोपी गौरवने नुकतेच 18 वर्षे पुर्ण केले आहे. त्यांचा एक अल्पवयीन साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.