पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. मात्र असे असताना देखील पुणे शहरातील कोयत्याने हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहे. आता कात्रज भागात एका तरुणावर अल्पवयीन मुलांनी कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 18 वर्षाचा विशाल विठ्ठल धुळे गंभीर जखमी झाला आहे. विशालवर 3 अल्पवयीन मुलांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी या मुलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशालचा या आरोपी मुलांसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याचा राग मनात ठेवून आरोपी मुलांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. विशाल कात्रज भागातील किनारा हॉटेल परिसरातून जात असताना या तिघांनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि तिथून पळ काढला. दरम्यान, कोयता गँगचे सत्र अद्यापही सुरूच राहिल्याने लोकांच्या मनात पुन्हा भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता कोयता गँगच्या दहशतेला वचक बसण्यासाठी पोलिस यंत्रणा नेमके काय ठोस उपाय करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.