पुणे -हजारो रुग्ण जेथे उपचारांसाठी येतात, त्या ससून रुग्णालयात सशस्त्र हाणामारीचा भयंकर प्रकार घडला. यामध्ये दोन्ही गटांकडून कोयते उगारण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी वॉर्ड नंबर 40 बाहेर घडली. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त कार्यालय आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन येथून हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे कोयता गॅंगला आता कोणाचेच भय राहिले नाही काय, रुग्णांच्या सुरक्षेबद्दल प्रशासन गंभीर आहे का, असे अनेक प्रश्न घटनेनंतर उभे राहिले आहेत.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राजसिंग जुन्नी, कुलदीपसिंग, लाखनसिंग, युवराजसिंग, जलसिंग, तोपनसिंग, जसपालसिंग (रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी) तसेच साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सावनसिंग जुन्नी (30, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक त्यांचा मोठा भाऊ सागरसिंग यास उपचारासाठी ससूनमध्ये घेऊन आले.
फिर्यादीच्या बहिणीसोबत अन्य महिलांचे जुने वाद होते. त्यावर फिर्यादी हे त्यांना समजवण्यास गेले असता तेथे राजसिंग आणि अन्य लोक आले. ते फिर्यादी यांना मारण्यासाठी धावून आले. कुलदीप याने हत्याराने वार केला. मात्र, फिर्यादी यांनी तो चुकवला. त्यानंतर जितेंद्रसिंग टाक यास राजसिंग युवराजसिंग याने लोखंडी कड्याने
मारहाण केली.
फिर्यादी यांचे भावाचा मुलगा सुखबीरसिंग यास काही आरोपी मारहाण करत असताना फिर्यादी त्यास वाचविण्यासाठी धावत गेले. तेव्हा युवराजसिंग लाखन याने हत्याराने फिर्यादीवर वार केला.
नागरिकांवरही उगारली हत्यारे
हा प्रकार पाहून रुग्णांचे नातेवाईक आणि सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. सुरक्षारक्षक आणि तेथील नागरिक फिर्यादी आणि सुखबीर यांना वाचविण्यासाठी धाऊन आले. मात्र, आरोपींनी हत्यार लोकांच्या दिशेने उगारले. त्यावेळी जमलेले लोक घाबरून पळून गेले. यानंतर लाखनसिंग व त्याच्यासोबत असणारे इतरांनी शिवीगाळ करुन धमकी देत पळ काढला.
हडपसरमध्ये दोन गटांमध्ये मारामारी झाल्यावर त्यातील जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी समोरील गटातील व्यक्ती तेथे दाखल झाले. त्यांच्यात वादविवाद झाल्यावर प्रकरण मारामारीपर्यंत गेले. याप्रकरणी पोलिसांच्यावतीनेही एक तक्रार बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तर हडपसरमध्येही उपचारासाठी दाखल झालेल्या जखमीच्यावतीने तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.
– संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस, निरीक्षक बंडगार्डन