Koyta Attack – कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात भररस्त्यात अडवून एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बाबुराव गायकवाड, कुणाल राहुल चौगुले व शुभम धर्मा सोलंकी (सर्व रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश सूर्यकांत पवार (वय 28, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आकाश पवार हे ऑनलाइन कुरिअर सेवा देऊन उदरनिर्वाह करतात. ते कवडीपाट टोलनाका परिसरातील एका लग्न समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री साडेदहा वाजता ते दुचाकीवरून घरी निघाले. मार्गात दत्त मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघाल्यानंतर लक्ष्मी लॉन्स परिसरात त्यांच्या मागून नंबर प्लेट नसलेल्या राखाडी दुचाकीवरून तिघेजण आले. या तिघांनी आकाश यांच्या दुचाकीसमोर आपली गाडी आडवी लावून त्यांना थांबवले आणि कोणताही वाद नसताना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एकाने त्यांना पकडून कोयत्याने पाठीवर वार केला, तर दुसर्याने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. तिसर्या आरोपीने बुक्यांनी मारहाण करत त्यांना खाली पाडले. या हल्ल्यात आकाश यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्या दुचाकीचेही नुकसान करत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत आकाश यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी अधिकृत फिर्याद नोंदवली.