Koyta Attack – गेल्या आठवड्यात झालेल्या भांडणात सामील असल्याच्या गैरसमजातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर कोयता व स्टीलच्या रॉडने हल्ला करण्यात आला. ही घटना रहाटणी परिसरात गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. संदेश कांबळे (वय २१, रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) याला अटक करण्यात आली आहे. तसेच अमोल लोंढे (वय २४), आदित्य शेंडगे (वय २३) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तुषार विजय डेंगळे (वय २२, रा. काळेवाडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार आणि त्यांचे मित्र तुषार (वय २४) हे गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रहाटणी येथील जिओ स्टोअरसमोरून जात असताना आरोपींनी त्यांना गाठले. मागील आठवड्यात झालेल्या एका भांडणात फिर्यादी नसतानाही, ते तिथे होते असा गैरसमज करून आरोपींनी तुषार डेंगळे यांच्या मित्राला रॉडने मारले आणि फिर्यादीवर कोयत्याने वार करून जखमी केले. काळेवाडी पोलीस ठाण्यातील हवालदार कांबळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.