Koynanagar : पोहायला गेलेल्या दोन मुलांचा कोयना नदीत बुडून दुर्दैवी अंत
Koynanagar : करण दाजी कदम (वय 15) आणि आर्यन अनिल कदम (वय 16, रा. गाडखोप, ता. पाटण) या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला.

Koynanagar : कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून कोयना धरण परिसरात नदीत पोहायला गेलेल्या करण दाजी कदम (वय 15) आणि आर्यन अनिल कदम (वय 16, रा. गाडखोप, ता. पाटण) या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, करण कदम व आर्यन कदम हे कोयना नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच सपोनि एस. के. ओलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने नदी परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. बराच वेळ सुरू असलेल्या मोहिमेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे गाडखोप गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबद्दल नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
दरम्यान, कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने, नदीचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे नदीत उतरताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





