Koynanagar: कोयनानगर बनत आहे बिबट्यांचा ‘हॉट स्पॉट’
Koynanagar कोयनानगर परिसरात बिबट्यांचा मानवी वस्तीजवळ वाढता वावर चिंतेचा विषय बनत आहे. यापूर्वी निवासी परिसरात बिबट्यांची तीन पिल्ले आढळली होती. आता नवीन मार्केटसारख्या वर्दळीच्या भागात जखमी बिबट्या आढळल्याने कोयनानगर बिबट्यांचा ‘हॉट स्पॉट’ बनत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

Koynanagar: येथील नवीन मार्केटमधील मानवी वसाहतीत पोस्ट ऑफिसमागे एका घराशेजारील ओढ्याजवळ जखमी बिबट्या आढळला. वन्यजीव विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असून त्याच्या डोळ्याला इजा झाली आहे. नागरिकांच्या वर्दळीच्या परिसरात जखमी बिबट्या आढळल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाल आहे. मात्र, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागला. आपत्कालीन परिस्थितीत वन्यजीव विभागाचा तत्पर प्रतिसादाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन मार्केटमधील घराशेजारी बिबट्या आढळणे ही घटना मानवी वस्तीतील सुरक्षिततेशी निगडित गंभीर बाब आहे. बिबट्याच्या डोळ्याला इजा झाल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली होती. अशा वेळी नागरिकांकडून माहिती मिळताच प्रशिक्षित पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचणे, परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवणे आणि बचावकार्य सुरू करणे अपेक्षित असते. मात्र, या घटनेत कर्मचारी पोहोचण्यास एक तास लागला. कर्मचारी दाखल झाल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी स्थानिकांनीही सहकार्य केले. वन्यजीव विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी २.२० वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. डोळ्याला इजा झालेल्या या बिबट्याला पुढील उपचारांसाठी कराड येथे दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य यशस्वी झाल्याने संभाव्य धोका टळला.
कोयनानगर परिसरात बिबट्यांचा मानवी वस्तीजवळ वाढता वावर चिंतेचा विषय बनत आहे. यापूर्वी निवासी परिसरात बिबट्यांची तीन पिल्ले आढळली होती. आता नवीन मार्केटसारख्या वर्दळीच्या भागात जखमी बिबट्या आढळल्याने कोयनानगर बिबट्यांचा ‘हॉट स्पॉट’ बनत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
जखमी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तास का लागला आणि कोयनानगरमधील वाढत्या बिबट्या वावरावर नियंत्रणासाठी विभागाची पुढील रणनीती काय, या प्रश्नांची उत्तरे आता वन्यजीव विभागाने देणे अपेक्षित आहे.





