कोयनानगर : सप्टेंबर महिना सुरू झाला तरी कोयना खोरे अजूनही सततच्या पावसाने भिजत आहे. सततच्या रिपरिपीमुळे ओलसर हवामान, चिखल आणि खोळंबलेली शेती कामे यामुळे कोयनावासीय त्रस्त झाले आहेत. धरणाची स्थिती आणि विसर्ग सततच्या पावसामुळे कोयना धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता धरणाची पाणीपातळी 2162 फूट 2 इंच (659.028 मीटर) नोंदली गेली. धरणात 103.52 टीएमसी (98.36%) पाणीसाठा असल्याने प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. धरणाचे दरवाजे पाचव्यांदा 1 फूट उघडण्यात आले असून, 9,100 कुसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. यासोबतच कोयना जलविद्युत केंद्रातून 2,100 कुसेक्स पाणी सोडले जात असल्याने एकूण 12,200 कुसेक्स पाण्याचा प्रवाह नदीपात्रात वाहत आहे. पावसाची आकडेवारी कोयना धरण क्षेत्रात 5 सप्टेंबर रोजी 6 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला, तर आतापर्यंतचा एकूण संचयी पाऊस 4,367 मिलिमीटर झाला आहे. नवजा केंद्रात 28 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला असून, एकूण पाऊस 5,453 मिलिमीटर आहे. महाबळेश्वर येथे 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस 5,229 मिलिमीटर आहे. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा सततच्या पावसामुळे आणि वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अखंड पावसामुळे आणि वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे कोयनावासीय “उन पडणार कधी?” असा प्रश्न विचारत आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने सुव्यवस्थित नियोजन आणि सतर्कतेसह परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.