Koyna Dam : कोयना धरणाला उन्हाचा फटका; बाष्पीभवनाचा रेट वाढला

कोयनानगर : कडक उन्हाच्या झळा आता कोयना धरणालाही जाणवू लागल्या आहेत. यंदा बाष्पीभवनाचा दर विक्रमी वाढला असून मे महिना सुरू होण्याआधीच तब्बल 7.46 टीएमसी पाणीसाठा हवेत उडून गेला आहे. ही वाढ पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात नोंदवली गेली असून तापमानातील तीव्र वाढ आणि हवामान बदल याला प्रमुख कारण ठरत आहेत.
दरवर्षी सरासरी 7.30 टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे नष्ट होत असते. मात्र, यंदाच्या वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला. एप्रिल महिन्यातच 7.46 टीएमसी पाणी बाष्पीभवनाने गमावल्याची नोंद जलसंपदा विभागाने केली आहे. तरीही दिलासादायक बाब म्हणजे धरणात सध्या 32.36 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा जलविद्युत प्रकल्प, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पुरेसा असून पावसाळ्यापर्यंतच्या गरजा भागवण्यास सक्षम आहे.
कोयना धरण हे राज्यातील एक प्रमुख जलस्रोत असून यावर कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अवलंबून आहेत. त्यामुळे अशा वेळी पाणीसाठ्याची सद्यस्थिती समाधानकारक आहे, हे निश्चितच दिलासा देणारे आहे. मात्र, भविष्यातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, योग्य नियोजन आणि पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.





